घरमहाराष्ट्रनाशिकशेतकर्‍यांची मुले कपबशी धुतात, पण शेती नको म्हणतात : उद्योगमंत्री सुभाष देसाई

शेतकर्‍यांची मुले कपबशी धुतात, पण शेती नको म्हणतात : उद्योगमंत्री सुभाष देसाई

Subscribe

शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री किंवा दुग्ध व्यवसायांची जोड मिळत नसल्यामुळे मर्यादीत उत्पन्न स्त्रोतांअभावी शेतकर्‍यांना नैराश्य येते. या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या वाढत असून, आपल्या आई-वडीलांची अवस्था बघून त्यांची मुले शहरातील एखाद्या हॉटेलमध्ये कपबशी धुण्याचे काम पसंत करतात, पण शेती करणे नाकारतात, असे सांगून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्याचे वास्तव मांडत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बॉयलर फार्मर अ‍ॅण्ड ब्रिडर असोसिएशन यांच्यातर्फे नाशिकमधील ठक्कर्स डोम येथे आयोजित पोल्ट्री प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष सी. वसंतकुमार, सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर, डॉ.साहेबराव राठोड, अरुण पवार आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, दुग्ध व्यावसायिक किंवा ऊस उत्पादक शेतकर्‍यांप्रमाणे पोल्ट्री व्यासायिकांनी संघटित होऊन, आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला पाहिजे. खासदार राजू शेट्टी ज्या आक्रमकतेने आंदोलन करतात, त्यापद्धतीने पोल्ट्री व्यावसायिकांनी आंदोलन केले पाहिजे. त्याशिवाय सरकार जागे होणार नाही. किमान त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचेल या पद्धतीने बोलले पाहिजे, असा अजब सल्ला देऊन देसाई यांनी पोल्ट्री व्यावसायिकांचे कान टोचले. शेती व्यावसायाला पूरक ठरणारे पोल्ट्री व दुध विक्री व्यावसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करू, पण हा विभाग आपल्याकडे नसल्यामुळे तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहू, असे सांगत त्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ज्या राष्ट्राचे आरोग्य चांगले ते राष्ट्र सदृढ मानले जाते, म्हणून पोल्ट्री व दुध व्यावसायाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

१५ दिवसांत बैठक

पोल्ट्री हा व्यावसाय पशुसंवर्धन खात्याकडे येत असल्यामुळे त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत सुभाष देसाई यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना खूश करणे टाळले. मात्र, येत्या पंधरा दिवसांच्या आत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची व पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक करून देण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

सुभाष देसाई उवाच…

  • तेलंगणा व ओरिसा राज्यांप्रमाणे कृषी औद्योगिक धोरण तयार करुन त्यात पोल्ट्री व्यावसायाचा समावेश करावा
  • पोल्ट्री व्यावसायिकांनी संघटीत होऊन खासदार राजू शेट्टी यांच्याप्रमाणे आक्रमक आंदोलन करायला हवे
  • अंडी व चिकन खाण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होईल
  • पोल्ट्री व्यावसायिकांनी मागणी केल्यास त्यांना 5 रुपयांपेक्षा कमी दराने वीज पुरवठा करणे शक्य
  • पोल्ट्रीसाठी धान्यादी मालास सुलभता मिळवून देण्यासाठी शासन संवेदनशीलपणे विचार करेल
  • लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका निर्धारित कालावधीतच होतील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -