घरमहाराष्ट्रनाशिकबिलवाडी परिसरात भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण

बिलवाडी परिसरात भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण

Subscribe

आदिवासी बांधवांनी घराबाहेर रात्र जागून काढली

भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि. 28 ) रात्री 4 व रविवारी (दि. 29) सकाळी 4 लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे. या भीतीपोटी सर्वांनी रात्र जागून काढल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, रविवारी सकाळी 10.45 मीटर आमदार नितीन पवार हे बिलवाडी येथे आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी व भूकंपाची माहिती घेण्यासाठी आले असता त्यांनी सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचा अनुभव घेतला. शनिवारी रात्री तहसीलदार बी. ए. कापसे व अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन दिलासा दिला. या धक्क्यांमुळे या भागातील आदिवासी बांधवांनी शनिवारची रात्र घराबाहेर जागून काढली. भूकंपाचे धक्के जाणवू लागताच पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे, बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, जामलेवणीचे मनोहर ठाकरे, देवळीवणीचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण यांनी आमदार पवार यांना माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान, रविवारी सकाळी आमदार पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे, बाजार समितीचे संचालक डी. एम. गायकवाड, राजू पाटील, युवराज चव्हाण, मनोहर ठाकरे, कृष्णा चव्हाण, सोनीराम गांगुर्डे यांनी भूकंपप्रवण क्षेत्रातील भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेत भयभीत झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला.

भूकंपप्रवण क्षेत्रात शासनस्तरावरुन उपाययोजना करुन दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली. शासनाने भूकंपप्रवण क्षेत्र भागात उपाययोजना करणे गरजेचे असून परिसर आदिवासी असल्याने शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य जगन साबळे व बिलवाडी, देवळीवणी, खिराड, मोहपाडा, पळसदर येथील आदिवासी महिला व बांधवांनी यावेळी आमदार पवार यांच्याकडे केली. याप्रश्नी शासन दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरात कायमस्वरुपी भूकंपमापन यंत्र बसून तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील आदिवासी बांधवांची आहे.

- Advertisement -

बिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी,चिंचपाडा व जामलेवणी, देवळीकराड, खिराड येथील आदिवासी नागरिकांनी रात्र घराबाहेर जागून काढली. भूकंपाचे धक्के त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोटीचा आसरा घेऊन ग्रामस्थांनी रात्र घराबाहेर काढली. शनिवारी रात्री 8:24, 8:35, 9:12,10 वाजता तर रविवारी सकाळी 7:47, 10:10, 10:30, 10:45 परिसरात भूकंपाचे धक्के बसले. शनिवारी रात्री व रविवारी सकाळीच वीजतारा झोक्यासारख्या हालत होत्या. झाडांसह विजेचे पोल हालत होते, घरातील भांडी पडली, पत्रे असलेल्या घरांना हादरे जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे यांनी सांगितले. भूकंपाच्या या जोराच्या धक्क्यांमुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असून कुठलेही नुकसान झाले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आता तरी लक्ष द्या…

बिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भागात भ्रमणध्वनी कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही, त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. काही माहिती द्यायची तर बाहेर जाऊन भ्रमणध्वनी करावा लागतो, अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय, काही झाले तेव्हा शासनाला जाग येईल काय? असा संतप्त सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.

यंत्रणा कार्यान्वित करा

या भागात दोन दिवसापासून भूकंपाचे धक्के बसत आहते.परंतु धक्का किती तिव्रतेचा होता, हे समजलेले नाही. भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र शासनाने बसवावे, त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता लक्षात येईल.आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी.  – आमदार नितीन पवार, कळवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -