स्थायी सभापतीपदासाठी तिन्ही आमदारांची ‘फिल्डिंग’

पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी पाच नगरसेवकांचे ठाण; गणेश गितेंचे ‘स्टार’ चमकण्याची चर्चा

Nashik
Rajiv gandhi bhavan (5)
MNC

स्थायी समिती सभापतीपदाचा चेंडू सध्या तरी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात असून सोमवारपासून सहा नगरसेवक पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी उमेदवारीसाठी ठाण मांडून बसल्याचे समजते. विशेष म्हणजे यातील पाच उमेदवार हे तिन्ही आमदारांच्या निकटवर्तीय असून एक इच्छूक उमेदवार पालकमंत्र्यांच्या जवळचा आहे. यामुळे पालकमंत्री आता कुणाला कौल देतात, हे येत्या गुरुवारी (ता. १८) स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांनी यापूर्वीच पाठीवर हात ठेवलेले गणेश गिते दोन दिवसांपासून ‘प्रतीक्षा रांगेत’ नसल्याने त्यांच्या उमेदवारीचे स्टार चमकले की काय, अशी चर्चा सुरू आहे.

महापालिकेची अर्थवाहिनी मानली जाणार्‍या स्थायी समिती सभापती पदाची बहुप्रतिक्षित निवडणूक १८ जुलैला होत आहे. याचदिवशी चारही विषय समित्यांच्या सभापती- उपभापतीपदांसाठी देखील स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्तारूढ भाजपातच रस्सीखेच सुरू आहे. यंदा महापालिकेत सत्तारूढ भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने स्थायी समिती सभापतीपदही भाजपकडेच जाणार हे निश्चित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापतीपद आपल्या मतदारसंघाला मिळावे, यासाठी आमदारांकडून चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.

सभापतीपदासाठी पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीय गणेश गिते, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे निकटवर्तीय कमलेश बोडके, आमदार देवयानी फरांदे यांचे निकटवर्तीय स्वाती भामरे आणि आमदार सीमा हिरे यांचे निकटवर्तीय भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाढ यांनी सभापतीपदासाठी पालकमंत्र्यांकडे ‘फिल्डींग’ लावली आहे. याशिवाय नगरसेवक उध्दव निमसे देखील सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. गिते वगळता अन्य नगरसेवकांनी मुंबईत ठाण मांडले असल्याने पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, पुष्पा आव्हाढ यांनी अर्ज प्राप्त केला असून अर्ज विक्रीची बुधवारी (ता. १७) दुपारी बारापर्यंत तर अर्ज भरण्याची दुपारी १ वाजेपर्यंतची वेळ आहे.

इतर समित्या नको रे बाप्पा-

स्थायी समितीसह अन्य पाच समित्यांची निवडणूक गुरुवारी होणार आहे. या विधी, शहर सुधारणा, वैद्यकी व आरोग्य, महिला व बालकल्याण या समित्यांचा समावेश आहे. मात्र, स्थायी वगळता अन्य समित्यांसाठी फारसे कुणी इच्छूक नसल्याने आता या समित्यांचे सभापतीपद कुणाला द्यावे, असा यक्ष प्रश्न पक्ष पदाधिकार्‍यांना पडला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here