औषध फवारणीचा ‘इव्हेंट’ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी काही नगरसेवकांकडून जंतूनाशक फवारणीचा अक्षरश: ‘इव्हेंट’ सुरु असून या माध्यमातून महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या कामाला अडथळा आणत ही मंडळी औषध फवारणीच्या ट्रॅक्टरवर बसून फोटोसेशनचीही हौस पूर्ण करुन घेत आहेत. गंभीर बाब म्हणजे या ‘इव्हेंट’वेळी आठ ते दहा कार्यकर्ते त्यांच्या दिमतीला असल्याने अशा गर्दी गोळा करणार्‍या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली आहे.

Nashik

करोनामुळे भीतीग्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन आणि महापालिका प्रशासन पूर्णत: प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे भारतात प्रथमच संपूर्ण शहरात सोडियम हायपोक्लोराईड फवारणीचे काम नाशिक महापालिकेने हाती घेतले आहे. या कामास जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बळकटी देत त्यांचे ट्रॅक्टर्स विनामुल्य उपलब्ध करुन दिले. त्यामुळे संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणाच्या कामाने वेग घेतला. मात्र या गतीस अडथळा आनण्याचे काम काही विद्यमान नगरसेवक करीत आहेत. ही मंडळी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांच्या कामात अडथळा आणत ट्रॅक्टरवर बसून फवारणीचा देखावा उभा करीत आहेत. ज्यांना ट्रॅक्टर चालवता येत नाही ते देखील फोटोसेशनसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेचे सुरु असलेले काम काही वेळासाठी थांबत आहे. अर्थात ही चमकोगीरी एकट्या नगरसेवकापुरतीच मर्यादीत नाही. तर संबंधित नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा ‘सोहळा’ साजरा करताना दिसतात. मुळात शहरात संचारबंदी लागू असताना कार्यकर्त्यांची गर्दी गोळा करुन अशा प्रकारचे ‘उद्योग’ करणे हाच कायद्याने गुन्हा ठरतो. त्यामुळे या चमको मंडळींवर तातडीने गुन्हे दाखल करावे अशी मागणी पुढे आली आहे.

गोर-गरीबांपर्यंत अन्न पोहचवण्याची अपेक्षा !

निवडणूक काळात दारोदारी जाणारी नगरसेवक मंडळी कोरोनाच्या संकटकाळात मात्र दिसत नाहीत असे संदेश काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फिरले होते. अशा ‘गायब’ नगरसेवकांना निवडणुकीत इंगा दाखवला जाईल असा इशाराही देण्यात आला होता. त्याला घाबरुन आता काही मंडळी संकट काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चमकोगिरी करत असल्याचे लक्षात येते. काही नगरसेवक मात्र गोरगरीबांपर्यंत अन्न-धान्य पोहचवण्याचे सत्कर्म करीत आहेत. अशा प्रकारचेच काम नगरसेवकांकडून अपेक्षीत असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.