पक्षीतीर्थावर प्रथमच फ्लेमिंगोंचा वर्षभर मुक्काम

कारणे: मुबलक खाद्य, सुरक्षितता अन वातावरणाची मोहिनी

Nashik
Flemingo
पक्षीतीर्थावर प्रथमच फ्लेमिंगोंचा वर्षभर मुक्काम

भक्ष्याच्या शोधात स्थलांतर करायचं आणि विणीचा हंगाम आला की मूळ अधिवासात परतायचं… देश-विदेशातील स्थलांतरीत पक्ष्यांचं हे जीवनचक्र. मात्र, नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात गेल्या वर्षी आलेल्या २ हजारांवर फ्लेमिंगोंपैकी ७० ते ८० फ्लेमिंगोंनी चक्क वर्षभर मुक्काम ठोकला आहे. मुबलक प्रमाणात खाद्य, सुरक्षित अधिवास आणि अनुकूल वातावरण यामुळेच परप्रांतिय फ्लेमिंगो परतले नसल्याचे चित्र आहे.

उत्तर महाराष्ट्राचं भरतपूर असलेलं नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्षांसोबतच स्थलांतरित पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागली की ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी देशी-विदेशी जातीचे हजारो पक्षी येतात. त्यात फ्लेमिंगोंसह स्पूनबिल स्टॉर्क, कॉमन कूट, खंड्या, वेडा राघू, राखाडी बगळा, सातभाई, धनेश, धोबी, पाणकोंबड्या, पाणबदक, पाणकावळे, भारद्वाज मोठ्या संख्येने बघायला मिळतात. या काळात धरणाच्या काढापासून पाणी थोडं कमी झालेलं असतं. त्यामुळे चिखलात गवत आणि किड्यांचे प्रमाण वाढते. हे भक्ष्य टिपण्यासाठी आलेल्या पक्षांची पर्वणी दरवर्षी पर्यटक अनुभवतात. सात महिन्यांच्या मुक्कामानंतर स्थलांतरित पक्षी मूळ अधिवास असलेल्या गुजरातमधील कच्छच्या रणात परततात. मात्र, गेल्या ऑगस्टमध्ये आलेले शंभरावर फ्लेमिंगो वर्ष होत आले तरीही परतलेले नाहीत.

ही आहेत मुक्कामाची संभाव्य कारणे

  • कमी कमी होत गेलेला जलसाठा
  • मुबलक प्रमाणात खाद्य\
  • विलंबाने आलेला पाऊस
  • संवर्धित क्षेत्रामुळे सुरक्षित अधिवास

निसर्गचक्राचा सुरेख वापर 

मे-जूनदरम्यान विणीच्या हंगामात चिखलापासून जमीनीपासून एक फूट उंचीपर्यंत ते घर तयार करतात. पावसाळ्यात या घरच्याखाली पाणी साचून, त्यातील किडे आधारासाठी या घरट्यावर वरच्या दिशेने चढतात. तोपर्यंत या पक्षांची अंडी उबलेली असतात. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या पिल्लांकडे किड्यांच्या रुपाने भक्ष्य स्वतःहून चालून आलेलं असतं. ज्या पक्षांना पिलं नाहीत, ते स्थलांतर करुन परप्रांतात पोहोचतात आणि इतर पिलांचा सांभाळ करतात.

अनेक वर्षांत प्रथमच मुक्काम

नांदुरमधमेश्वर परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित अशा दोन्हीही प्रकारचे पक्षी आहेत. स्थलांतरित पक्षी ठराविक कालावधीनंतर परततात. मात्र, यंदा प्रथमच फ्लेमिंगो वर्षभर मुक्कामी राहिल्याचे चित्र आहे.– गंगाधर आघाव, पक्षीमित्र