फुलांमध्ये हरपल्या राणुअक्का; म्हणाल्या,जाईल तिथे करेल वृक्षजागृती

(अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचे उदघाटन; पुष्पांचे मूल्य नवीन पिढीत रुजण्याची व्यक्त केली गरज)

Nashik

सेकंड होमसाठी नाशिकची निवड का केली जाते हे नाशकातील पुष्पोत्सव बघितल्यानंतर आज कळले, असे गौरवोदगार छत्रपती संभाजी मालिकेत राणुअक्काची भूमिका साकारणार्‍या अश्विनी महांगडे यांनी काढले. पुष्पोत्सव बघून मलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढील काळात मी जेथे जाईन तेथे किमान तीन रोपं लावण्याचा संदेश देईन, असेही त्या म्हणाल्या.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनात तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन अश्विनी महांगडे यांच्या हस्ते झाले. नवीन पिढीला पुष्पांचे आणि निसर्गाचे मूल्य कळणे गरजेचे आहे. हे मूल्य अशा महोत्सवांच्या माध्यमातून रुजतात, असे नमूद करीत अश्विनी महांगडे म्हणाल्या की, चांगल्या गोष्टींची सुरुवात मुठमर माणसे करतात. त्यात खंड पडल्यानंतरही तितक्याच ताकदीने ही मंडळी ती गोष्ट नव्याने उभी करतात. नाशिककरांनीही पुष्पोत्सवाच्या निमित्ताने चांगल्या गोष्टीची सुरुवात केली आहे. मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकताच आहे. यापुढील काळात प्रत्येकाने पुष्पांचा अभ्यास करावा. महाराष्ट्रातील प्रत्येक शहराने आणि गावाने हा उत्सव बघावा आणि आपापल्या ठिकाणी त्याचे आयोजन करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुष्पोत्सवाची माहिती देत महाशिवरात्रीनिमित्त बेल उत्सवाचे आयोजन केल्याचे नमूद केले. या उत्सवात शुक्रवारी (दि. २१) महापालिकेच्या वतीने तीन हजार बेलाच्या रोपांचे वाटप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक चंद्रकांत खाडे, अजिंक्य साने आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर उपमहापौर भिकूबाई बागूल, भाजप गटनेते जगदीश पाटील नगरसेविका हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव, सुषमा पगारे, आशा तडवी, शाहीन मिर्झा, श्यामकुमार साबळे, नयना गांगुर्डे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

करारी संवादाने उभा राहिला रोमांच :

अश्विनी महांगडे यांनी छत्रपती संभाजी मालिकेतील एक रोमहर्षक संवाद ऐकवला. त्यांच्या संवादफेकीची बाणेदार ढब आणि आवाजातील करारीपणा ऐकून उपस्थितांमध्ये रोमांच उभा राहिला.

अनुपस्थितांचीच संख्या अधिक :

कार्यक्रमास अनेक महापालिकेच्या पदाधिकारी अनुपस्थित होते. यात विरोधीपक्ष नेता अजय बोरस्ते, काँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, रिपाइंच्या गटनेत्या दक्षा लोंढे आदींचा समावेश होता. उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आयुक्त राधाकृष्ण गमेही मुंबईत गेले होते. त्यामुळे ते देखील कार्यक्रमास अनुपस्थित होते.

‘आपली माणसं, आपली संस्कृती’ची रंगत

महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यानंतर आर. एम. ग्रुप प्रस्तुत ‘रंग मराठमोळा- आपली माणसं, आपली संस्कृती’ या नृत्य आणि गाण्यांचा कार्यक्रमाने रंगत आणली. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता प्रसाद दुसाने प्रस्तुत सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तर शनिवारी सायंकाळी ७ वाजता भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल.

पुष्पोत्सवातील विजेते-

 • गुलाब राजा- सोनू काठे
 • गुलाब राणी- पुष्पक फ्लोरीटेक
 • गुलाब राजकुमार- पपया नर्सरी
 • गुलाब राजकुमारी- बाबूलाल नर्सरी
 • फुलराणी- बाबूलाल नर्सरी
 • सर्वोत्कृष्ठ कुंड्यांची रचना- प्रसाद नर्सरी
 • सर्वोत्तम बोन्साय- बाबुलाल नर्सरी
 • ताज्या फुलांची रचना- प्रसन्ना करेकर
 • जपानी पुष्परचना- स्मृती जिंतूरकर
 • पुष्प रांगोळी- पुजा बेलदार
 • परिसर प्रतिकृती स्पर्धा- नाशिक पूर्व उद्यान विभाग
 • सर्वात्तम परिसर प्रतिकृती स्पर्धा- प्रसाद नर्सरी
 • सर्वात्तम तबक उद्यान- अरुण पाटील

पुष्पोत्सवातील मनमोहक छायाचित्र बघण्यासाठी क्लिक करा:

नाशिक महापालिकेत पुष्पोत्सवाची दरवळ