पोषण आहार ‘खाणार्‍या’ मुख्याध्यापकास सक्तीची निवृत्ती

जिल्हा परिषदेची कारवाई; बनावट दाखला देणार्‍या शिक्षिकेवर होणार फौजदारी

Nashik
ZP_Nashik
जिल्हा परिषद, नाशिक

शाळेतील विद्यार्थ्यांचा पोषण आहारात फस्त करणार्‍या मुख्याध्यापकास सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेने काढले आहेत. तसेच डॉक्टरांचे बनावट प्रमाणपत्र सादर करून रजेवर गेलेल्या महिला शिक्षिकेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने एकाच दिवसात दोन शिक्षकांना तंबी दिली आहे. पहिल्या प्रकरणात इंदारे (ता. दिंडोरी) येथील शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकात पवार यांचे कामकाज संशयास्पद असल्याचे गावातील पालक, ग्रामस्थ यांनी लेखी तक्रारी दिली होती. तसेच पदाधिकार्‍यांनीही याबाबत तोंडी तक्रार केली होती. शालेय पोषण आहारात अनियमितता, मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये समन्वय नसणे, शाळा भेटीच्या वेळी अनुपस्थित असणे, अभिलेखे अद्यावत नसणे याबाबत दोषारोपण बजावण्यात आले होते. तसेच याबाबत सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली होती. चौकशीत आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसर्‍या प्रकरणात अंजन (ता.मालेगाव) येथील प्राथमिक शिक्षिका पल्लवी मुरलीधर कापडणीस यांनी वैद्यकीय रजेसाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मालेगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी मालेगावच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

पोषण आहार ठेकेदारास नोटीस

शालेय पोषण आहार नियमित करण्याचे आदेश दिल्यानंतरही पुरवठा करणार्‍या ठेकेदाराने पुरेशा तांदळाचा पुरवठा केलेला नाही. त्याविषयी अनेकदा सूचना देऊनही ठेकेदार त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे त्यांना तीन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर पुरवठादारावर ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी म्हटले आहे.