‘स्मार्ट सिटी’च्या ठेकेदाराला 40 लाखांचा दंड

ठेकेदाराला काम करण्यास विलंब झाल्याने महापालिकेच्या म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने हा घेतला निर्णय

Nashik
smart road collector
‘स्मार्ट सिटी’च्या ठेकेदाराला 40 लाखांचा दंड

शहरातील अशोक स्तंभ ते गडकरी चौक या स्मार्ट रोडचे काम दिलेल्या ठेकेदाराला प्रतिदिवस 39 हजारांप्रमाणे आत्तापर्यंत 40 लाखांचा दंड झाला आहे. मार्चअखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ठेकेदाराला काम करण्यास विलंब झाल्याने महापालिकेच्या म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश झाल्यानंतर नाशिकमध्ये स्मार्ट रोडचे काम हाती घेण्यात आले. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशिल असलेल्या या रस्त्यावर शासनाचे महत्वाची कार्यालये असल्याने येथे 24 तास वर्दळ असते. त्यामुळे ठेकेदाराला काम करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. अशोक स्तंभापासून काम सुरू झाल्यानंतर एकेरी वाहतूक करण्यात आली. मेहेर सिग्नलपर्यंतचा मार्ग मोकळा झाल्याने येथील वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र,गोळे कॉलनीकडे जाणारा रस्ताच खोदून ठेवल्यामुळे आता अशोकस्तंभाकडे एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक होताना दिसते. त्यामुळे शहराची स्मार्ट कोंडी झाली आहे.

पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे येथे आंदोलनांच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सीबीएस या महत्वाच्या चौकातच स्टेट बँक व शाळा असल्यामुळे या भागात नागरिक व विद्यार्थ्यांचा नेहमी वावर असतो. स्मार्ट सिटीच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्ता बंद केला आहे. तसेच पोलिसांनी बॅरीकेट्स लावल्याने अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. या स्मार्टकोंडीवर उपाय योजना करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत असताना महापालिकेनी ठेकेदारास दंड केला आहे. या रोडचे काम मार्च 2019 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्याने वेळेत काम न केल्यामुळे त्याला प्रतिदिवस 29 हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत 39 लाख 24 हजार रुपयांचा दंड केला आहे. यापुढील काळात हा आकडा कोटीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.