घरमहाराष्ट्रनाशिकबनावट फिंगर प्रिंटद्वारे आधार प्रणालीची फसवणूक

बनावट फिंगर प्रिंटद्वारे आधार प्रणालीची फसवणूक

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील ऑपरेटरचा 'उद्योग'; केंद्र सरकारच्या डिजिटल तंत्राला आव्हान

दिंडोरी तहसील कार्यालयातील आधार केंद्रावरील एका ऑपरेटरने स्वतःचेच बनावट फिंगरप्रिंट तयार करत थेट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या आधार प्रणालीचीच फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी, १७ ऑगस्टला उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी मडकी जाम येथील ऑपरेटर कैलास धोंडीराम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बनवेगिरीमागील सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे.

आधार केंद्रामधून सातत्याने एकाच ठराविक प्रकारचे थम्ब केले जात असल्याची माहिती मुंबईतील यूआयडी केंद्राच्या निदर्शनास आल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी तातडीने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी मांढरे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना तपासाचे आदेश दिले. गाढवे यांनी तातडीने संबंधित आधार केंद्रात धाव घेत तपासणी केली असता, या ठिकाणी बनावट फिंगर प्रिंटचा ठसा आढळून आला. घटनेची खातरजमा झाल्यानंतर गाढवे यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी केंद्रामधून काळ्या रंगाची ग्रीप असलेला बोटांचे रबरी थम्ब इम्प्रेशन, अॅसर कंपनीचा लॅपटॉप, थम्ब मशीन, आयरिश मशीन, कॅनन कंपनीचे स्कॅनर, वेब कॅमेरा असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

उच्चस्तरीय सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आधार (यूआयडी) प्रणालीमधील प्रत्येक व्यक्तीची माहिती सुरक्षित राहावी, यासाठी उच्च सुरक्षा उभारण्यात आली आहे. असे असतानाही एखाद्या लहान गावातील ऑपरेटर बनावट फिंगर प्रिंट तयार करुन या यंत्रणेचीच फसवणूक करत असल्याने संबंधित विभागाला आता अधिक सतर्क राहून यातील त्रूटी दूर कराव्या लागणार आहेत. अन्यथा, एखाद्या ऑपरेटरचा थम्ब तयार करुन त्याद्वारे देशविघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तीही यंत्रणेची दिशाभूल करत स्वतःचे हवे तसे आधार कार्ड तयार करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

- Advertisement -

पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

बनावट थम्ब तयार करण्याचा हेतू, हा थम्ब तयार करण्यासाठी मदत करणारे सूत्रधार, या थम्बद्वारे झालेली एण्ट्री असा चौफेर तपास पोलिसांना करावा लागणार आहे. जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशी फसवणूक होत असेल तर त्याकडेही अत्यंत गांभीर्याने लक्ष घालून संबंधित व्यक्तींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात अशा प्रवृत्तींकडून संवेदनशील माहितीमध्ये छेडछाड होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -