घरमहाराष्ट्रनाशिकविश्वास नांगरे-पाटलांच्या नाशिकमध्ये चक्र जुगाराचे

विश्वास नांगरे-पाटलांच्या नाशिकमध्ये चक्र जुगाराचे

Subscribe

शहरात सुरू असलेल्या या जुगार अड्यांच्या चक्रावर ‘आपलं महानगर’ने टाकलेला प्रकाश...

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांमुळे शहरात जुगार अड्ड्यांचे पीक ठिकठिकाणी वाढले आहे. गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे घडण्यासाठी प्रवृत्त करणारे हे अड्डे आज पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात सुरू आहेत. शहरातील पंचवटी, भद्रकाली, इंदिरानगर या परिसरांसह बड्या हॉटेल्समध्ये रोलेट, बॉलगेम, चक्री, सट्टा, कॅसिनो, रम्मी, काठी फिराव, तीन पत्ते, बिंगो, मटका यांसारखे जुगाराचे प्रकार सर्रासपणे खेळले जातात. विश्वचषक क्रिकेटचे सामने सुरू असल्यामुळे त्यावरील बेटिंगलाही उधाण आले आहे. गंभीर बाब म्हणजे असंख्य तरुणांचे आयुष्य जुगारामुळे उद्ध्वस्त झाले आहे. वाढलेले कर्ज आणि त्याच्या परतफेडीसाठी केलेले गुन्हेगारी कृत्य असे चक्र जुगारामुळे अव्याहतपणे फिरत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सुरू असलेल्या या जुगार अड्यांच्या चक्रावर ‘आपलं महानगर’ने टाकलेला प्रकाश…

जे मिश्र, सरंगलांना जमले ते नांगरे-पाटलांना का जमू नये?

एप्रिल २००९ ते एप्रिल २०११ या काळात विष्णूदेव मिश्र यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाची सूत्रं होती. त्यांनी प्रथमत: शहरातील जुगार अड्डे बंद करण्यावर भर दिला. त्यानंतर फेब्रुवारी २०१३ ते मार्च २०१५ या काळात पोलीस आयुक्तपदाची धुरा समर्थपणे पेलणारे कुलवंतकुमार सरंगल यांनी जुगार अड्ड्यांना तोंड वर करू दिले नाही. म्हणजेच पोलीस आयुक्तांनी ठरवले तर अशा अवैध धंदे ते बंद करू शकतात हे यावरून स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र सर्वच ‘आनंदी आनंद’ होता. एस. जगन्नाथन आणि रवींद्र सिंगल यांच्या काळात जुगार अड्ड्यांनी पुन्हा मान वर काढली. त्यांच्या काळात जुगार अड्ड्यांवर लुटुपुटूच्या कारवाया झाल्या. त्यातून अड्डे मात्र बंद झाले नाहीत. विद्यमान आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना सिंगम म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यांनाही अद्याप हे अड्डे बंद करण्यात यश आलेले नाही हे विशेष.

- Advertisement -

चक्क माणसांना ठेवले जाते तारण

रोलेटवर पैसे लावणार्‍यांचे प्रमाण कमालीचे मोठे आहे. दोघे मित्र जर खेळ खेळायला गेले आणि त्यांच्याकडील पैसे संपल्यानंतरही ते खेळत राहिले तर त्यातील एकाला संबंधित चालक अक्षरश: तारण म्हणून ठेऊन घेतो. दुसर्‍याने अपेक्षीत पैसे घेऊन रोलेट अड्ड्यावर यायचे असते. त्यासाठी रक्कमेनुसार तीन ते चार दिवसांची मुदत दिली जाते. या मुदतीत पैसे जमा करण्यासाठी तरुण गुन्हेगारी मार्गाचा विशेषत: चोर्‍यांचा मार्ग पत्कारतात. ज्यांना तारण ठेवले जाते त्यांना कॉलेजरोड परिसरातील एखाद्या कार्यालयाबाहेर दिवसभर बसवले जाते. रात्रीच्या वेळी संबंधितांची झोपण्याची व्यवस्था कार्यालयातच केली जाते.

इन्कमिंगवर जोर; आऊटगोईंगला पैसे नाकारण्याची कारणेच अधिक

रोलेटसह बहुसंख्य जुगार खेळणार्‍यांना लुबाडलेच जाण्याची शक्यता अधिक असते. एखाद्याला जास्त पैसे मिळाले तरीही त्याला चोरी झाली, आपला माणूस पैसे घेऊन पळाला असे कारणे देत पैसे देण्यास नकार दिला जातो. पैसे जर घ्यायचे असेल तर मात्र मारून-मुटकून संबंधितांकडून ते बळकावले जातात.

- Advertisement -

रोलेटमुळे केली आत्महत्या

पंचवटीतील राऊ चौक परिसरात एका प्रतिष्ठीत घरातील तरुणाने काही महिन्यांपूर्वीच रोलेटमुळे आत्महत्या केली. या तरुणावर कर्ज वाढल्याचे बोलले जात होते.

जागा बदलण्याची शक्कल

पोलिसी कारवाईचा बडगा टाळण्यासाठी व एकाच ठिकाणी दोनदा कारवाई झाली तर होणार्‍या शिक्षेची वाढणारी तीव्रता कमी करण्यासाठी अड्डे चालकांकडून सातत्याने आपल्या अड्ड्यांची ठिकाणे बद्दलण्याचा फंडा अवलंबवला जात असल्याने सर्रासपणे अर्थात पोलिसांना ही ठिकाणे माहीत नाहीत यावर सामान्य नागरिकांचा विश्वास बसत नाही हे त्रिवार सत्य आहे.

हाय प्रोफाइल जुगार

पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी उच्चभ्रू लोकांकडूनच हाय प्रोफाइल जुगाराचे अड्डे चालविले जातात, यात प्रामुख्याने काही लोकप्रतिनिधी, त्यांचे नातेवाईक, झेरॉक्स नगरसेवकांचा समावेश आहे. अर्थात या प्रकारच्या अड्ड्यांचे आयुष्य फारतर एक किंवा दोन दिवसांचे असते. या प्रकारात परिसराबाहेरील रिसॉर्ट किंवा हॉलिडे स्पॉटला मोठी रक्कम देऊन ते बुक केले जातात. यासाठी लागणारा पैसा आपापसातील किमान ३० ते ४० जणांकडून गोळा केला जातो. येथे दिवसभराच्या चहा, नाष्ता, जेवणापासून ते सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातात. या एक किंवा दोन दिवसात येथे सर्रासपणे खुलेआम जुगाराच्या विविध प्रकारांचे डाव रंगत असतात. या प्रकारातून अल्प काळात मोठी उलाढाल होते. खर्च वजा जाता मिळणारा फायदा सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागला जातो.

इंदिरानगर आघाडीवर

सुशिक्षित आणि उच्चविचारसरणीच्या रहिवाशांची वसाहत अशी ओळख असलेल्या इंदिरानगर परिसरातही जुगाराचे हॉट स्पॉट आहेत. विशेषतः राजीव गांधी वसाहत, वडाळा गाव, राजीवनगर, चेतनानगर या परिसराबरोबरच महामार्गलगतच्या काही मोजक्या हॉटेलांमध्येही अवैधरित्या जुगाराचे डाव रंगत असतात. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली ही ठिकाणे नेहमीच वादाच्या आणि चर्चेच्या भोवर्‍यात फिरत असतात.

लोकसभा निवडणूक होताच अड्डे सुरू

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या नंतर आलेल्या सोमनाथ तांबे यांनी यश मिळविले होते. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रामुख्याने दत्तचौक, संजीवनगर, दत्तनगर, चुंचाळे, अंबड लिंकरोड, उत्तमनगर, दिव्या अ‍ॅडलॅब या परिसरात लहान-मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, पोलिसी कारवाईत यातील बहुतांश अड्डे बंद झाले होते. तथापि हे अड्डे बंद झाले असले तरी परिसराच्या इतर भागात चोरी-छुपे जुगाराचे अड्डे चालविले जात आहेत. पोलिसांना या प्रकाराची माहिती नाही असे म्हणणे धाडसाचे ठरावे. काही महिन्यांपूर्वी डॉ. सिंगल यांच्या आदेशाने अंबड पोलीस ठाणे हद्दीतील अनेक जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात येऊन ते बंद पाडण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची बंधने शिथिल होताच यातील तथाकथित अड्डे चालकांच्या प्रयत्नांना धुमारे फुटू लागल्याने जुगार व मटक्याचे अड्डे सुरू होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

विश्वचषकामुळे बेटिंगला पेव

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे शहरात पुन्हा बेटिंगचे पेव फुटले असल्याचे बोलले जाते. यात मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने पैसे लावले जात असल्याचेही कळते. रविवारी झालेल्या भारतपाकिस्तान सामन्यात भारतावर ३० पैसे तर पाकिस्तानवर दीड रुपया दर असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस दादा माहित नसेल तर ही घ्या अड्ड्यांची माहिती…

  • आडगाव येथे अनेक पुरुषांसह महिलादेखील मटक्याचे आकडे लावण्यासाठी गर्दी करतात.
  • पंचवटीत एका नगरसेविकेच्या मुलाचा पत्त्याचा क्लब सुरू असल्याचे कळते
  • मुंबई महामार्गावरील एका उंच हॉटेलच्या सातव्या मजल्यावर पत्त्यांचा अड्डा असल्याचे सांगितले जाते
  • गंगापूर रोडवरील एका हायफाय क्लबमध्ये राजकीय पुढार्‍यांचा पत्त्यांचा अड्डा सुरु असल्याचे कळते
  • नाशिक- पुणा रोडवरील एका क्लबमध्ये आजी-माजी नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते पत्ते कुटण्यासाठी जात असल्याचे समजते
  • सीबीएस परिसरात काही गाळ्यांमध्ये मटका आणि जुगार खेळला जातो. संबंधित मालक गाळे वारंवार बदलत असतात.
  • वाघाडीतील अड्डे बंद करण्याची ‘हिंमत’ आजवर कुणी केली नाही हे विशेष.
  • भद्रकालीतील व्हीडिओ हॉल परिसरातील अड्डे अनेक वर्षांपासून सुरू आहेत
  • शहरातील पूर्व भागातील आडगाव, कोणार्कनगर, हुनमाननगर, सरस्वतीनगर, बालाजीनगर या ठिकाणी मटका, पत्याचे क्लब, सोरटसारख्या अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे.
  • महामार्गालगत अनेक हॉटेल्समध्ये पत्याचे क्लब सकाळपासून सुरू होतात.
  • कोणार्कनगरमध्ये एका रो-हाऊसमध्ये पत्त्यांचे डाव रंगत आहेत.
  • रम्मी (डब्बा) नाशिक कारखाना परिसर, शिंदे गाव, कदम कंपाऊंड, उपनगर कॅनल रोड, भगूर बसस्थानक या परिसरांत रम्मीचे डाव रंगतात.
  • नांदूर नाका जनार्दन पुलाजवळ येथील पत्र्याचे शेड १३,२१,२७ पानांची रम्मी, पॉईट रम्मी, सौदे चालतात.
    मुक्तीधाम परिसरातील पान स्टॉलच्या वर दोन नंबरच्या गाळ्यात क्लब सुरू आहे. या ठिकाणी हप्त्यावरून वाद झाला असून पाच दिवसांपासून तो बंद झाल्याची चर्चा आहे.
  • एकलहरा येथील एका हॉटेल मध्ये २१ व २७ पत्ते रम्मीचा खेळ चालतो.
  • सिन्नर फाटा अश्विन कॉलनी म्हाडाच्या रूममध्ये तीन पत्ती, काठी फिराव, २१ पत्ती रम्मी चालते.
  • स्टेशनजवळ रेल्वे क्वार्टर परिसरात काठी फिराव, तीन पत्ती, २१ व २७ पत्ती रम्मी चालते.
  • रेल्वे स्टेशनजवळ कदम कंपाऊंड २१ व २७ पत्ती रम्मी चालते.
  • फर्नांडीस वाडी २१, २७ पत्ती रम्मी चालते.
  • २१ पानांची रम्मी हा खेळ नाशिक पंचवटी, नांदूर नाक्याजवळील जनार्दन पुलाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये, भगूरच्या पुढे एका ढाब्यावर, देवळाली कॅम्प परिसरात खेळला जातो.

जिल्ह्यात ४६३ जणांना अटक

डॉ. आरती सिंह यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार २ मार्च २०१९ रोजी स्वीकारल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीस काढण्यासाठी अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. विशेष मोहीम राबवत अवैध धंदे तत्काळ बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. मार्च ते मे महिन्यात जुगार अड्डे उदधवस्त जुगार कायद्यान्वये २०२ केसेस दाखल करून ४६३ जुगार्‍यांना अटक केली. त्यांच्याकडून ३८ लाख १६ हजार ४४४ रूपयांची रोकड जप्त केली. स्थानिक पातळीवरील लागेबांधे लक्षात घेऊन डॉ. आरती सिंह यांनी विशेष पथकाची निर्मिती करून जिल्ह्यात धाडसत्र राबविले. या पथकाने तालुकानिहाय छापे टाकून जुगाराच्या १० केसेस दाखल करून ३३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगार साहित्य असा सुमारे ७ लाख ११ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अर्थपूर्ण हितसंबंध कारवाईतील अडथळा

शहरासह उपनगरात बिनधास्तपणे सरू असलेल्या जुगारांच्या अड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या वरिष्ठ आधिकार्‍यांच्या सूचनेबाबत पोलिसच हलगर्जीपणा करत असल्याचे वास्तव दिसते. शहरात कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट मिशन राबविण्यात आले. मात्र, त्यातील सातत्य न टिकल्याने पुन्हा सर्वत्र जुगाराच्या अड्ड्यांना बळ मिळताना दिसत आहे. अर्थपूर्ण लागेबांधेच जुगार अड्ड्यांना बळ देत आहेत. विश्वास नांगरे-पाटील यांनी २२ मार्च रोजी कोम्बिंग ऑपरेशन करत ६ जुगारींवर कारवाई केली होती. मार्च महिन्यात ग्रामीण पोलिसांनी जुगार कायद्यान्वये १४ केसेस दाखल करत ३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

नाशिकरोडला खुल्या, छुप्या पद्धतीने जुगार सुरुच

नाशिकरोड परिसरात मटका थांबलेला नाही. जुगार कान्याकोपर्‍यात सुरुच आहे. पोलीस आपापल्या कामात व्यस्त आहेत. पोलीस ठाण्यात फोन करुन माहिती घेतली तर ठाणे अमंलदार म्हणतात..’ शांतता आहे, माहिती निरंक आहे ’ असे असताना ‘आपलं महानगर’च्या हाती क्लबचे फोटो लागले आहेत, मटका आणि जुगार जोरात सुरु असल्याचे पुरावे लागले आहेत, हे धक्कादायक. पोलिसांना अशा धंद्याविषयी माहिती मिळत नाही किंवा मिळूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, हेही तितकेच खरे.

फिराव, अंदरबाहरची चलती

फिराव किंवा अंदर-बाहर हा खेळ चोरून लपून सुरु आहे, यात झटपट पैशांची उलाढाल होते, यावर मोठ्या रकमा लावल्या जातात. एक प्रकारे झटपट लॉटरीचा प्रकार म्हटले तरी वावगे ठरू नये. परंतू यात पत्ते लावून एखाद्याला टारगेट पण करता येते, यासाठी चार पाच खेळाडू एकत्र येऊन (पार्टीने) पत्ते लावले जातात.

तिर्रट (तीन पत्ते)

नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर, उपनगर, आडगाव, नांदूर नाका, शिंदे, आदी ठिकाणी चोरून लपून तीन पत्यांचा खेळ खेळला जातो, यात पन्नास रुपये टेबलपासून पाचशे रुपये टेबलपर्यंत फ्लॅश खेळली जाते.

पोलिसांनी केलेली कारवाई

  • रेल्वे स्टेशन हद्दीतील कदम कंपाऊंड (नाशिकरोड पोलीस) सध्या पुन्हा सुरु
  • नांदूर नाका जनार्दन पुलाजवळ (आडगाव पोलीस ठाणे)
  • संसरी (गुन्हे शाखा)
  • पळसे- पडताळ (नाशिकरोड पोलीस)
  • चेहेडी (नाशिकरोड पोलीस)
  • रोकडोबा वाडी(उपनगर पोलीस)
  • भगूर बस स्टॉप (देवळाली कॅम्प पोलीस)
  • शिंदे (नाशिकरोड पोलीस)

अल्पवयीन मुले आहारी

राज्यस्तरीय रोईंगपटू निखिल सोनवणे १४ मे रोजी चोपडा लॉन्स येथून जात असताना चोरट्यांनी हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर अल्यवयीन मुले होते. तपासात शहरातील गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. अल्पवयीन मुले व्यसन, जुगाराच्या आहारी गेल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती केली जात आहे. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

पथकांना कारवाईचे आदेश

शहरात एखाद्या ठिकाणी अवैध जुगारअड्डे सुरू असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी छापे टाकत क्राईम ब्रँच व पोलीस ठाणेनिहाय सक्त कारवाई केली जात आहे. जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचे पथकांना आदेश दिलेले आहेत. दोन महिन्यापूर्वी नाशिकमध्ये रूजू झाल्यापासून मी स्वत: मोठे छापे टाकत कारवाई केली आहे. – पौर्णिमा चौघुले, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -