इंदिरानगरला गॅरेजमालकाचा खून

नाशिक शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून, २० दिवसांपुर्वी पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असताना गुरुवारी (दि.१२) सकाळी दुसरी खूनची घटना उघडकीस आली आहे. गॅरेजमालकाच्या डोक्यावर लोखंडी गजाने वर्मी घाव करत चोरट्यांनी खून केल्याची घटना वडाळा पाथर्डी रोडवरील श्रीजी प्लाझाच्या बाजूला, मेट्रो झोनसमोरील श्री गुरुकृपा गॅरेज येथे घडली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कार पळवून नेली आहे. उत्तरप्रदेश येथील रामचंद्र रामपराग निशांत (३७) असे मृत्यू झालेल्या गॅरेजमालकाचे नाव आहे.

रामचंद्र निशांत यांचे श्री गुरुकृपा गॅरेज आहे. या ठिकाणी चारचाकी वाहनांची दुरुस्ती व वॉशिंग केली जाते. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आकाश पवार गॅरेजमध्ये कामासाठी आला असता त्यांना चारचाकी वाहन वॉश करण्याच्या रॅम्पवर मोबाईल तुटलेल्या अवस्थेत दिसला. ते पुढे गेला असता गॅरेजमालक रामचंद्र निशांत मृतावस्थेत आढळून आले. पवार यांनी तत्काळ गॅरेजचे भागीदार मुरगन तंभी, शेजारील दुकानदार आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मुरगन सिगमनी ऊर्ग तंभी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.