‘गो कोरोना गो’च्या घोषणा पडल्या महागात; पंतप्रधानांच्या आवाहनाला टवाळखोरांनी दिला छेद

ड्रोन उडवणारे चौघे ताब्यात

Nashik
drone

कोरोनाविरोधातील लढाईत एकजूट दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास शहरात चार टवाळखोरांनी छेद देत कायदेभंग केला. गो कोरोना गो अशी घोषणाबाजी करत चौघांनी विनापरवाना हवेत ड्रोन उडवला. ही बाब पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ड्रोन व मोबाईल जप्त केला. ही घटना सप्तश्रुंगी कॉलनी, पखालरोड येथे घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल आनंदा पेखळे, सुमीत संजय कोरपड, प्रथमेश सुरेश निचळ, किरण अशोक विंचुरकर (सर्वजण रा.निलोफर अपार्टमेंट, सप्तश्रुंगी कॉलनी, पखालरोड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.५) रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीजेचे दिवे बंद करुन दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन केले होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी शहरात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. मुंबईनाका पोलीस ठाणेहद्दीत व्दारका बीट मार्शल किशोर सूर्यवंशी, पोलीस हवालदार आप्पा पानवळ पखालरोड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत होते. सप्तश्रुंगी कॉलनी, पखालरोड येथे राहुल पेखळे, सुमीत कोरपड, प्रथमेश निचळ, किरण विंचुरकर हे अपार्टमेंटच्या समोरील जागेत गो कोरोना गो अशी आरडाओरड करत होते. तसेच त्यांनी विनापरवानगी ड्रोन हवेमध्ये उडवत असल्याचे सूर्यवंशी व पानवळ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौघा टवाळखोरांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील ड्रोन व ड्रोनला लावलेला मोबाईल जप्त केला.

नागरिकांना आवाहन

करोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात कोणीही विनाकारण भटकंती करु नये, विनाकारण काही कृत्य करु नये तसेच विनापरवाना ड्रोनसह इतर उपकरणांव्दारे सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.