घरमहाराष्ट्रनाशिकहरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीच्या महाआरतीस प्रारंभ

हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीच्या महाआरतीस प्रारंभ

Subscribe

राज्य शासनाकडून प्रथमच आरतीसाठी निधी मंजूर; निवडणुकीपूर्वी भाजपची नाशिककरांना भेट

नाशिककरांचे जीवन अखंडितपणे प्रवाही करणार्‍या गोदामाईने शहराला तीर्थक्षेत्र म्हणून ओळख दिली आहे. ही नदी शेतकर्‍यांची जीवनवाहिनी तर आहेच, पण तिचे धार्मिकदृष्ठ्याही महत्व आहे. आता तिच्या पाण्यात निवडणुकीचे राजकीय तरंगदेखील उमटू लागले आहेत. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने गोदावरीकडे लक्ष केंद्रीत करत हरिद्वारच्या धर्तीवर नदीच्या आरतीसाठी तब्बल २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत हा निधी खर्च केला जाणार आहे. आरतीसाठी निधी देण्याची ही राज्य सरकारची पहिलीच वेळ आहे. या आरतीचा प्रारंभ पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १९) सायंकाळी करण्यात आला.

हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची आरती करण्याची संकल्पना गेल्या पंधरा वर्षांपासून मांडली जात आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तत्कालीन महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर पुरोहित संघाच्या वतीने गोदावरीची नित्यनेमाने आरती सुरू झाली. मात्र निधीचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे तिला भव्य-दिव्य स्वरुप मिळू शकले नाही. त्यानंतर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक अर्थात तानने आरतीचा उपक्रम सुरू केला. नाशिकमध्ये आलेल्या प्रतिष्ठीत पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्याची प्रथा त्यांनी रुढ केली. शिवाय काही स्वयंसेवी संस्था विशेषत: पर्यावरण प्रेमी मंडळी आपला वाढदिवस नदीची आरती करुन साजरा करतात; परंतु हरिद्वार, प्रयाग आणि काशीच्या धर्तीवर महाआरती आजवर कधी झालीच नाही.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसने गोदावरीची आरती करून निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्याचे नियोजन सुरू झाले होते. परंतु तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आरतीच्या ‘पवित्र कार्यात’ उडी घेतली असून त्यासाठी २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यात आरतीचे साहित्य, आरतीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीची जागृती यांवर खर्च करण्यात येणार आहे. या आरतीचे माध्यमांमध्ये ब्रण्डिंगदेखील करण्यात येणार आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर गुरुवारी आरतीला शुभारंभ करण्यात आला. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोंडाई, धुळे, जळगाव महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

नाशिक गोदावरी आरती

हरिद्वार, प्रयागराज या ठिकाणी होणार्‍या आरतीला भाविक मोठया संख्येने हजेरी लावत असतात. ही बाब लक्षात घेऊन नाशिकच्या गोदा आरतीचे विपणन करण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यात आता पर्यटक वा नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून गोदाआरती सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती होईल. तसेच निवडणुकीनंतर कधीना कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेही आरती करण्याचे आम्ही नियोजन करु. आरतीचा संपूर्ण खर्च हा पर्यटन विभागाच्या वतीने उभारण्यात येईल.  -जयकुमार रावल, पर्यटन मंत्री

- Advertisement -

आरतीसाठी काही निधी लागला तर तो उपलब्ध करून देऊ..

गोदावरी नदीची महाआरती सुरु करुन आम्ही आमचे कर्तव्य निभावले आहे. या आरतीत खंड पडणार नाही याची जबाबदारी आता नाशिककरांना पार पाडावी लागणार आहे. आरतीसाठी अजून काही निधी लागला तर तो राज्य शासनाकडून निश्चितच उपलब्ध करुन देण्यात येईल. या आरतीच्या माध्यमातून आत्मियता, धार्मिकता निर्माण झाली पाहिजे, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.  -गिरीश महाजन, पालकमंत्री

गोदावरीची महाआरती कशासाठी

– नदीचा सन्मान होईल
– आरतीमुळे नदीच्या पावित्र्याची भावना लोकमनावर अधिक ठळकपणे अधोरेखित होऊन नदी प्रदूषित करण्यास कोणी धजावणार नाही
– पर्यटन विकासाला चालना मिळेल
– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांना मतदारांचा कौल मिळेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -