घरताज्या घडामोडीसलुनमध्ये जाताय.. आधारकार्ड, ओळखपत्र जवळ बाळगा

सलुनमध्ये जाताय.. आधारकार्ड, ओळखपत्र जवळ बाळगा

Subscribe

नाभिक समाजाकडून विशेष खबरदारी : व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर प्रशासनाने भर दिला आहे. या पार्श्वभुमीवर सलुन व्यावसायिकांनीही आता ग्राहकांना आधारकार्ड किंवा ओळखपत्र सक्तीचे केले आहे. नाशिक जिल्हा सलुन असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांना परवानगी दिल्यानंतर कटींग, दाढीसाठी येणार्‍या प्रत्येक ग्राहकाचा नाव, पत्ता, आधार क्रमांक नोंदवला जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडीत यांनी सांगितले. आम्ही सर्व अटी, शर्थींचे पालन करतो, मात्र व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या अशी मागणी नाभिक समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले. यामुळे सलुन व्यावसायिकही लॉकडाऊनच्या कात्रीत सापडले. लॉकडाऊनमधून इतर व्यवसायांसाठी थोडी शिथिलता असली तरी सलुन व्यवसाय ३० जूनपर्यंत पूर्णपणे बंदच राहणार असल्याचे चित्र आहे. परवानगीसंदर्भात नाभिक समाज संघटनांकडून मागणी होत असली तरी, जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या पाचव्या टप्प्यात सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी नाभिक समाज संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतू सर्वाधिक प्रसाराचे साधन म्हणजे हा व्यवसाय आहे. लोकांशी थेट जवळून संपर्क येत असल्याने दोघांनाही धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन सलुनची दुकाने सुरू करण्याची जोखीम घेण्यास तयार नाहीत. मात्र आता प्रशासनाला सहकार्याची भूमिका म्हणून नाभिक समाज संघटनेने स्वतःची नियमावली तयार केली आहे. ज्यात दूकानांत येणार्‍या प्रत्येक ग्राहकाचा नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक नोंदविण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर त्याचा आधार क्रमांकही नोंदवला जाणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र डिस्पोजल चादर, नॅपकिन वापरला जाईल. तसेच दाढीसाठी ब्रश ऐवजी फोमचा वापर केला जाईल. वापरावयाची साधने निर्जंतुक केली जातील अशा प्रकारची सर्व खबरदारी घेउन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा व महानगर सलुन असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक ईशी, राजेंद्र नगरकर, दत्ता अनारसे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

… अन्यथा आंदोलन
गेल्या दोन महीन्यांपासून व्यवसाय बंद आहे. एकिकडे अनेकांची दूकाने ही भाडेतत्वावर असल्याने भाडे थकले आहे. तर अनेकांनी विविध कारणासाठी कर्ज घेतल्याने कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन सर्व दूकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत असतांना केवळ नाभिक समाजावर अन्याय करत आहेत. आम्ही सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करू, आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दुकाने सुरू करून द्या. याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास न्यायालयात धाव घेउ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केशकर्तनालय सुरू करू.
विजय पंडीत, जिल्हाध्यक्ष नाभिक असोसिएशन

ग्राहकांच्या खिशाला कात्री
सलून असोसिएशनने दाढी, कटींगसह इतर सेवांचा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कंटींगसाठी १०० रूपये तर दाढीसाठी ५० रूपये मोजावे लागतील. डिस्पोजल चादर, नॅपकिन, सॅनेटायझर याचा खर्च वाढल्याने दरवाढ करणे क्रमप्राप्त असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे आता चांगले दिसण्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -