बी. एड. महाविद्यालयांना प्रवेशासाठी ‘अच्छे दिन’

राज्यातील 509 महाविद्यालयांमध्ये 52 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज; 3 सप्टेंबरला गुणवत्ता यादी

Nashik
प्रतींनिधिक फोटो

शिक्षक होण्यासाठी आवश्यक बी. एड. या दोन वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अंतिम टप्प्यावर पोहोचले असून, यंदा राज्यातील 45 हजार जागांसाठी तब्बल 52 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुढील वर्षी हा अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार असल्याने चालू वर्षी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येतो. त्यामुळे बी. एड महाविद्यालयांना अनेक वर्षांनंतर ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येते. दरम्यान, 3 सप्टेंबर रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या गुणवत्ता यादीनुसार 4 ते 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश दिला जाईल.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती व खासगी शिक्षण संस्थांमधे शिक्षकांना अनुदानीत करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे बी. एड. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बी. एड्. महाविद्यालयांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली होती. मात्र, शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल केला असून, बी.एड् हा अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळे यंदा प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दोनच वर्षात ही पदवी प्राप्त होईल. तसेच पुढील वर्षी प्रवेश घेतल्यास चार वर्ष अवधी लागेल, अशी भिती विद्यार्थ्यांंच्या मनात आहे.

या विषयी विद्यार्थ्यांमध्ये बराच खल झाल्यामुळे अनेकांनी इच्छा नसताना देखील बी.एड.साठी प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली आहे. परिणामी, राज्यातील 509 महाविद्यालयांतील सुमारे 45 हजार जागांसाठी तब्बल 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेश पात्रता परीक्षेनुसार या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन विकल्प अर्ज भरले आहेत. त्याआधारे पहिली गुणवत्ता यादी 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, 4 ते 7 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश दिले जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत 18 महाविद्यालये व तीन महाविद्यालये मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत आहेत. जिल्ह्यात एकूण सोळाशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

महाविद्यालये व प्रवेश क्षमता

नूर महाविद्यालय-50, ‘मविप्र’चे अ‍ॅड.हांडे महाविद्यालय-150, लोहोणेर-100, मालेगाव-50, नांदगाव-50, मालेगाव जेएटी-50, क. का. वाघ-100, खातून-50, एम. जी. विद्यामंदीर-100, चुंचाळे महाविद्यालय-50, मातोश्री एकलहरे-100, मोतिवाला कॉलेज-50, ब्रह्मा व्हॅली-100, पीव्हीजी(म्हसरुळ)-50, येवला-100, समर्थ महा. (सातपूर)-50, अभोणा-100, बाभुळगाव-100, बहिणाबाई महाविद्यालय-50, अशोका महाविद्यालय-100, मालेगाव महिला कॉलेज-50.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयात सुविधा केंद्र तयार

बी.एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयात सुविधा केंद्र तयार केले आहे. त्याआधारे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. यंदा विद्यार्थ्यांचा उत्साह बघता सर्व महाविद्यालयांचे प्रवेश पूर्ण होतील.  -डॉ.चंद्रकांत बोरसे, प्राचार्य, अ‍ॅड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here