Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक वाचन संस्कृती जोपासणार्‍या ग्रंथपालांच्या स्वप्नांना सुरुंग

वाचन संस्कृती जोपासणार्‍या ग्रंथपालांच्या स्वप्नांना सुरुंग

वाचन प्रेरणा दिन विशेष : अखेरच्या पिढीच्या हाती वाचन वृद्धीचे ओझे

Related Story

- Advertisement -

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवून विचारांनी सशक्त पिढी घडवण्याची प्रमुख जबाबदारी पेलणार्‍या ग्रंथपालांचे पदच कालबाह्य ठरवणारे सरकारी धोरण राबवले जात असल्याने राज्यात 596 पदे आजही रिक्त आहेत. तसेच, पूर्णवेळ ग्रंथपाल होण्याच्या अपेक्षेनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या 1172 अर्धवेळ ग्रंथपालांच्या स्वप्नांना या निर्णयामुळे आता सुरुंग लागला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारे हे ग्रंथपाल आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्णवेळ ग्रंथपाल नेमण्यासाठी किमान एक हजार विद्यार्थ्यांची अट घालण्यात आली असून, यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतची विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरण्यात येते. उर्वरीत ठिकाणी निम्म्या वेतनावर अर्धवेळ ग्रंथपाल नियुक्त केले जातात. विद्यार्थ्यी संख्येची अट घातल्यामुळे वर्षानुवर्ष शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्यामुळे यापुढे ग्रंथपालांची नव्याने भरती होणे अशक्य आहे. याउलट विद्यार्थ्यांची संख्या रोडवत असल्याने आहे त्या ग्रंथपालांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची भिती व्यक्त केली जाते. राज्यात 1772 अर्धवेळ व सुमारे 2100 पूर्णवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. वर्षागणिक अतिरीक्त ठरणार्‍या ग्रंथपालांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत वाचन संस्कृती रुजवण्याचे ध्येय कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होतो. मराठी शाळांचे प्रमाण एकीकडे कमी होत असताना स्वयंअर्थसहाय्य असलेल्या शाळांचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत किमान एक हजार विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेलाच पूर्णवेळ ग्रंथपाल देण्यात येईल. त्यात इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वगळण्यास आल्याने बालवयात त्यांच्यात वाचनाची आवड कशी निर्माण होईल, हा प्रश्न ग्रंथपालांना पडला आहे. त्यामुळे वाचनसंस्कृती रुजवण्याच्या संकल्पनेला राज्य शासनाकडून अप्रत्यक्षरित्या हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते.

५० टक्के शाळा ग्रंथपालविना

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात सुमारे सातशे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या तुलनेत 93 अर्धवेळ आणि 125 पुर्णवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. साधारणत: 25 जागा रिक्त असून 31 ग्रंथपाल विद्यार्थी संख्येमुळे अतिरीक्त ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील 50 टक्के शाळांमध्ये ग्रंथपाल नाही किंवा वाचनालये नसल्याचे यावरुन सिध्द होते.

वाचन संस्कृती कमकुवत करण्याचे धोरण

डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्याऐवजी तिला कमकुवत करण्याचे धोरण राबवले जाते. त्यामुळे ग्रंथपालांची ही शेवटची पिढी कार्यरत असल्याचे दुदैवाने म्हणावे लागते.
– विलास सोनार, राज्याध्यक्ष, ग्रंथपाल शिक्षक परिषद

- Advertisement -