ग्रामपंचायत सेवकाची गोळ्या झाडून हत्या 

वडझिर्‍यातील घटना : शेतजमिनीच्या वादातून लहान भावाने केला खून

शेतजमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची कपाळावर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.७) रात्री सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे घडली. या घटनेत ग्रामपंचयात सेवकाचा मृत्यू झाला असून, सिन्नर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास नामदेव कुटे (३५, रा.गितेमळा, वडझिरे, ता.सिन्नर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा नामदेव कुटे (२५, सध्या रा.उद्योगभवन, सिन्नर, मूळ रा.वडझिरे), साथीदार प्रविण (२८, रा. शिवाजीनगर, सिन्नर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

देविदास कुटे हे वडझिरे ग्रामपंचायतीचे सेवक होते. त्यांचे लहान भावासोबत शेतजमिनीवरुन वाद सुरु होते. कुटे मंगळवारी रात्री शेतवस्तीवरील घरात पत्नी, तीन मुली व सासूसह घरात झोपले होते. रात्री ११.३० वाजेचा सुमारास आरोपी कृष्णा व त्याचा साथीदार प्रविण यांनी गावठी पिस्टलच्या सहाय्याने जमिनीच्या वादातून देविदास कुटे याच्यावर तीन राउंड फायर त्यांची निर्घूण हत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी येत पाहणी केली असता देविदास कुटे याच्या कपाळ, पाठी व मांडीवर तीन गोळ्या लागलेल्या दिसल्या. पोलिसांनी तपास सुरु करत दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ पिस्टल, १५ जीवंत काडतुसे जप्त केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, एमआयडीसी पोलीस गोपाळ नवले आदींनी केली.

पिस्टल, काडतुसे देणारांचा शोध सुरु

आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे व जीवंत काडतुसे परजिल्ह्यातून आणल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पिस्टल कोणाकडून व कोणाच्या मदतीने आणले, याचा तपास पोलीस करत आहेत.

कट रचून केला खून

मृत देविदास कुटे याचा भाऊ कृष्णा कुटे याने साथीदार प्रविण व आणखी आरोपींच्या मदतीने खूनाचा कट रचला. या गुन्ह्यात सहभागी असलेले, वापरलेले हत्यारे, जीवंत काडतुसे मिळवून देणारे अशा सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत.