Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक ..अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; अवघ्या २० मिनिटांत द्राक्षबाग जमीनदोस्त

..अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; अवघ्या २० मिनिटांत द्राक्षबाग जमीनदोस्त

द्राक्षबागेत पाणी साचल्याने बागांना आधार देणारे अँगलच आडवे; आता विविध रोगांचे आव्हान

Related Story

- Advertisement -

पूनम शेवाळे, जायखेडा

यंदा निर्धोक व औषधांचे निकषांप्रमाणे तंतोतंत प्रमाण असलेली द्राक्ष ग्राहकांना पुरवण्याच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांना परतीच्या पावसाने पुन्हा तडा गेला आहे. द्राक्षाचे आगर असलेल्या मोसम खोऱ्यातील पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील द्राक्षबागायतदार शेतकरी विडू जिभाऊ भामरे यांच्या शेतातील दोन एकर द्राक्षबागेत पाणी साचल्याने बागांना आधार देणारे अँगलच आडवे झाल्याने द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. निसर्गाने तोही तोंडचा घास हिरावल्याने शेतक-यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. भामरे यांचे ३० ते ३५ टन द्राक्षाचे नुकसान होऊन लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आता डावण्यासह डझनभर रोगांच्या प्रादुर्भावासह मणीकुज, फुलगळीची भीती आहे. निर्यातक्षम द्राक्षांच्या मण्यांवर डाग पडून त्यांच्या दर्जात घसरणीची भीती आहे. या पावसाने निर्यातक्षम द्राक्षासह इतर पिकांना सुमारे पाचशे कोटींचा फटका बसू शकतो, असा द्राक्ष बागायतदार शेतकरी तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

वेधशाळेने वर्तवलेल्या अतीवृष्टीच्या अंदाजानुसार तंतोतंत पावसाने हजेरी लावली. दोन-चार दिवसांत मात्र मुसळधार पाऊस कोळतोय. शनिवारी पावसाने सगळीकडे भंबेरी उडवून दिली. सलगपणे दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी उभे राहिले. पिंगळवाडे येथील जीभाऊ भामरे यांनी आपल्या पत्नीच्या नावावरील गट नं. २४३ मध्ये क्लोन २ या जातीच्या द्राक्षांची लागवड केली होती. यंदाच्या मोसमात जून महिन्यात छाटणी केली होती. त्यानंतर सुरुवातीला यंदा पावसाळा कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बहरले होते. त्यानंतर जवळपास शंभर दिवसानंतर तयार झालेल्या दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाला असून, त्या बागेसाठी सुरुवातीपासून यंदा चार लाख रुपये खर्च केला आहे. त्याचबरोबर द्राक्ष उभारणीसाठी लागणारा अँगल व तार यांचे देखील जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून व शनिवार रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसाने द्राक्षासह रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेत शिवारात पाणी साचून राहिल्याने पिकांना धोका वाढला आहे. आताच उगवू लागलेली रब्बीची पिके पाण्याखाली गेलीत. दलदलीत उतरून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर फवारणी घेण्याची धडपड करत असतांना व काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, शेतक-यांच्या आशेचा किरण गायब झाला आहे. अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.

पंधरा दिवसांतील पावसाचे पाणी जमिनी मुरले आहे. ओढ्या-नाल्यांतून पाणी वाहतेय. उगूळ फुटावा, अशी स्थिती आहे. त्यात या मुसळधार पावसाची भर पडल्याने साहजिकच आज दुपार झाली तरी पाणी मुरलेले नव्हते. उसाच्या सरीत, द्राक्ष बागेत बांधा कडेला पाणी साचून राहिले आहेत. द्राक्ष बागांतून पाणी बाहेर काढण्यासाठी सकाळपासून शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. त्यात भर म्हणून दावण्याचा दणका बसला आहे. फळभाज्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका याला फटका बसला आहे. मेथी, कोथींबीर जमीनदोस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

Grapes
जायखेडा भागात द्राक्षबागांचे झालेले नुकसान

झेंडूचेही मोठे नुकसान

तालुक्यातील बहुंताश भागातील शेतक-यांच्या शेतात दसरा व दिवाळी सणांसाठी झेंडूची शेती बहरलेली आहे, मात्र शनिवारच्या पावसाने कळ्या आणि फुलांची पुरती दाणादाण करून टाकली आहे. अनेक ठिकाणी रोपटी जमिनीला टेकली आहेत. परिणामी, दसरा व दिवाळीत झेंडूची आवक कमी होण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

- Advertisement -