घरमहाराष्ट्रनाशिकग्राहकांची पाठ; बाजाराला द्राक्ष आंबट

ग्राहकांची पाठ; बाजाराला द्राक्ष आंबट

Subscribe

दोन महिने रेंगाळलेल्या थंडीबरोबरच आवकही वाढल्याने द्राक्षाच्या बाजाराचे गणित बिघडले आहे. १५ मार्च नंतरच दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

द्राक्ष उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात मागील दोन महिने थंडी रेंगाळलेली असतांना द्राक्षाचे मार्केट मंदावलेलेच राहिले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी घटली असली तरी उठाव वाढलेला नाही. मागणीच्या तुलनेत यंदा आवक वाढली आहे. या स्थितीत देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात द्राक्षांच्या दरातील घसरण कायम आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष शिवारात सौदे सुरु आहेत. परप्रांतीय व्यापारी, तसेच निर्यातीच्या बाजारासाठीही खरेदीदार शिवारात फिरत आहेत. मात्र त्यांच्याकडून खरेदीची चढाओढ होत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. आवक जास्त असल्याने व्यापार्‍यांना अधिक पर्याय उपलब्ध असल्याने बहुतांश ठिकाणी दर पाडून मागितले जात असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. नाशिकमधून गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक या राज्यात द्राक्ष पाठवली जात आहेत. १५ मार्चनंतर देशांतील इतर राज्यातून मागणी वाढेल असेही या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

- Advertisement -

ऑक्टोबर छाटण्या एकाच वेळी

प्रयोगशील द्राक्ष उत्पादक सतीश आहेर म्हणाले की, हवामान अंदाज यंत्रणेकडून सप्टेंबर २०१८ महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला होता. ‘अर्ली’ छाटणी घेणार्‍या बहुतांश द्राक्ष उत्पादकांना ‘छाटणी घेतल्यास द्राक्षाच्या पोंगा अवस्थेत पावसात सापडू’ या भीतीने ग्रासले होते. त्यामुळे त्यांनीही ‘लेट’ छाटणीवर भर दिला. परिणामी बहुतांश छाटण्या या एकाच वेळीस आल्याने त्यातही पुन्हा थंडी लांबल्याने बहुतांश मालाचा खुडा एकाच वेळी आला. या स्थितीत बाजारात आवक वाढली. मात्र १५ मार्चनंतर आवक कमी होण्याची चिन्हे आहेत. या काळात दरात वाढ होईल असा अंदाजही आहे.

१५ मार्चनंतर चांगल्या दराची अपेक्षा

थंडी आणि जास्त आवकेचा फटका बसत आहे. द्राक्ष उत्पादकांनी घाई करु नये. १५ मार्चनंतर चांगल्या गुणवत्तेच्या मालाला चांगला दर मिळेल अशी स्थिती आहे. – रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

- Advertisement -

गत सप्ताहातील द्राक्षांचे सरासरी दर (प्रति किलो)

थॉमसन – २५
सोनाका- ३५
शरद सीडलेस- ३५
जम्बो सीडलेस- ४०

गत सप्ताहातील निर्यातक्षम द्राक्षांचे सरासरी दर (प्रति किलोचे)

थॉमसन- ६५
सोनाका- ४५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -