सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायतीच्या नव्या जलस्त्रोताला हिरवाकंदिल

शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडून कामाला मान्यता

Nashik
Saptshrungi Gadh

गडावर चणकापूर धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव रेंगाळल्याने उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतीने जलस्त्रोतासाठी प्रस्तावित केलेला गडावरील नवीन बंधारा शासनाच्या उच्चस्तर समितीने मंजूर केला आहे. या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतुदही करण्यात आलेली आहे. त्यामुळे गडावर उन्हाळ्यात भाविक आणि ग्रामस्थांना पाणीबाणी भासणार नाही.

सप्तश्रृंगीगडाला पर्यटन आणि तिर्थक्षेत्र म्हणून ग्रामविकास व जलसंधारणर मंत्रालयाने ब वर्ग दर्जा प्रदान केलेला होता. त्यामुळे येथील सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतीने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे विकासाकामांचा पाठपुरावा सुरु केलेला होता. त्यात गडावर पाणीपुरवठासाठी नवीन बंधारा असावा, अशी मागणी प्रामुख्याने लावून धरलेली होती. गडविकासाचा आराखडा आणि त्यासाठी लागणारा निधीचे पत्र भुसे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेले होते. त्यात त्यांनी गडावर नवीन बंधार्‍याची शिफारस केलेली होती. राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेत असलेल्या उच्चाधिकार समितीची जेव्हा आराखड्यातील कामांच्या तरतुदींवर चर्चा होती. त्यावेळी नव्या बंधार्‍याचा विषय वाढीव कामात मंजुर करण्यात या कामासाठी 1 कोटी 88 लाख 72 हजार रुपयांची रकम कामासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.

गडावर सध्या भवानी तलावातून पाणी पुरवठा होतो. हा तलाव घातात असल्याने तेथून पाणी उपसून ते गडावर आणले जाते. पाण्याची टंचाई जेव्हा भासते तेव्हा गडावर दूसरास्त्रोत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने गडावर रस्त्याच्या लगत असलेल्या जागेत हा बंधारा बांधण्याचे ठरवले होते. ग्रामपंचायतीचा ठराव करून ग्रामविकास अधिकार्‍यांच्या माध्यमातून तो प्रशासनाकडे पाठविलेला होता. त्याचबरोबर गडावर येणार्‍या लाखो भाविकांच्या निवार्‍याची चिंता दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने भक्त निवार्‍याची सूचना केलेली होती. मात्र, पक्के बांधकाम करण्यास वनविभागाची हरकत असल्याने येथे चार डोम उभारण्याचे काम ग्रामपंचायतीने प्रस्तावित केलेले होते. त्यामुळे सुमारे 1 कोटी 54 लाख रुपये खर्च करून 2 लाख चौरस फुट क्षेत्रफळावर शिवालय तलावालगत हे चार डोम उभारण्यात येणार आहे. यात भाविकांना मोठ्या प्रमाणात निवार्‍याची व्यवस्था होणार आहे. त्याचबरोबर गडावरील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी, जलवाहीनींसाठी लोखंडी पाईपांचे जाळे, गडावरील शाळेला संरक्षक भिंत, महिला-पुरूषांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भाविकांसाठी मोठ्या सोई-सुविधा आणि विकासकामे होणार आहेत.

गत दीड वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आल्याने गडावरील मुलभूत सोई-सुविधातील त्रुटी दूर होऊन त्याचा लाभ ग्रामस्थांसह देवीच्या दर्शनाला येणार्‍या लाखो भाविकांना होणार आहे.

तांबुळतिर्थ ते परशुरामबाला पर्यायी मार्ग

गडावर दरड कोसळत असल्याने प्रदक्षिणामार्ग बंद करण्यात आलेला आहे. भाविकांकडून प्रदक्षिणा करताना मार्गावरील परशुरामबाला देवस्थानचे दर्शन घेतले जाते. मात्र मार्ग बंद असल्याने हे देवदर्शन बंद झालेले आहे. यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायतीने तांबूळतिर्थ ते परशुरामबाला देवस्थान हा पर्यायी मार्ग सुचविला होता. हा मार्ग बनविताना पर्यावरणाची हाणी होणारे काम टाळून तो मार्ग गवताळ पद्धतीने करण्यात येणार आहे. या कामासाठी 2 कोटी 81 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. – राजेश गवळी, उपसरपंच सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायत