बिन गुरू ग्यान कहाँ से पाऊ!

गुरुपौर्णिमा विशेष : शहरातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांकडून स्मरण आठवणींच्या कुपीतील

Nashik
Gurupaurnima
बिन गुरू ग्यान कहाँ से पाऊ!

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ll
आषाढ शुद्ध पौर्णिमेला मंगळवारी (ता. १६) सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. ‘गुरू बिन ग्यान कहां से पाऊ, दीजो ग्यान हरि गुण गाऊं&’ या संत कबीरांच्या दोह्याची प्रचिती आपणास रोजच येते. गुरू असं ज्ञान देतो ज्यातून परमेश्वराच्या भक्तीची अनुभूती मिळते. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला सर्वोच्चस्थान असते. पण जे आपापल्या क्षेत्रात गुरुस्थानी आहेत, त्यांचे गुरु कोण आणि त्यांनी आपल्या हृदयाच्या कुपीत या गुरूंप्रतिची कोणती सुखद आठवण जपून ठेवली आहे हे जाणून घेण्याचा ‘आपलं महानगर’चा हा विशेष प्रयत्न…

यशवंतरावांच्या सहवासात संस्कारांची शिदोरी

खरेतर आपण जे काही शिकत असतो, ते शिकवणारा आपला त्या क्षेत्रातील गुरुच असतो. परंतू, आपण ज्या क्षेत्रात नावारुपाला येतो, ते शिकवणारे आपले गुरू अशी परंपरा आहे. या अर्थाने यशवंतराव चव्हाण हे माझे गुरू. मीच नव्हे तर माझ्या पिढीतल्या असंख्य कार्यकर्त्यांचे ते गुरू आहेत. संयमी व्यक्तिमत्त्व, प्रासादिक वक्ते, स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीतले अग्रणी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. भारत सरकारमधील संरक्षण, गृह आणि वाणिज्य मंत्री. त्यांचा सहवास लाभल्याने आपोआप संस्कार घडत गेले. – विनायकदादा पाटील, माजी मंत्री

संस्कारातूनच जीवनाला कलाटणी

वाचायला लागल्याबरोबर चांदोबा मासिक हाती देणारी आई पहिली गुरु. अढळ वागण्यातून कणखरपणाचे संस्कार करणारे वडील दुसरे गुरू. शाळेत गेल्यानंतर चित्रकलेच्या वर्गात ही रंगपेटी स्वतःची समजून वापरा म्हणजे तुम्ही जपून वापराल, असे सांगणारे चित्रकला शिक्षक श्री. पुरंदरे हे शालेय जीवनातील गुरू. त्यांच्या संस्कारांमुळेच आजही कार्यालय ही माझी स्वतःची वास्तू आहे आणि तेथील कामकाजाचा दर्जा उत्तम राहील याची दक्षता मी घेतो. माझ्या जीवनाला कलाटणी देणारे श्रीनिवास इनामदार हेदेखील वंदनीय गुरु. नैराश्यामुळे पेपर न देण्याच्या मनःस्थितीत असताना ही परीक्षा म्हणजे जीवनाचा अंत नाही, असे एका सांगणारे इनामदार यांच्यामुळे मी पेपर दिला आणि त्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत वर्ग एकचा अधिकारी होऊ शकलो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त या सर्व गुरूंना माझे विनम्र वंदन! – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

आई-वडीलच प्रथम गुरू

आई-वडील हे माझे गुरु आहेत. नाशिक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करत असताना त्यांनी शिकवलेल्या संस्कारांची रोज आठवण येते. त्यांनी बालपणापासून कठोर परिश्रम करण्यास शिकवले. त्यातून वैयक्तिक व सामाजिक जीवनात सकारात्मक बदल झाले. आई व वडील हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळे आजपर्यंत येथे पोहोचले आहे. – डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

आभाळाएवढा माणूस : डॉ. शंकरराव गोवारीकर

अवकाश क्षेत्रात वाटचाल होण्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचा मोलाचा वाटा आहे. माहेर कोल्हापूरचे असल्याने आणि डॉ. गोवारीकर हेदेखील तिकडचेच असल्याने कौटुंबीक ऋणानुबंध आहेत. भाभा अनुसंशोधन केंद्राचे संचालक असतानाही त्यांच्या वागण्यात अत्यंत साधेपणा होता. ते जेव्हा कधी नाशिकला येतात तेव्हा आवर्जुन भेटतात. आम्ही जुळ्या बहिणी, दोघींचेही ते गुरू. आभाळाएवढा माणूस असुनही, त्यांच्या स्वभावात कधी अहंभाव दिसला नाही. अगदी जमीनीवर राहून त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक प्रकल्पांत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. नासासाठी माझी निवड झाली, त्यातही त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा होता. – अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर

फुटबॉल स्टड्सची अविस्मरणीय भेट

शालेय जीवनात वाडेकर सरांकडून फुटबॉलबाबतचे प्रोत्साहन अन् क्रीडाक्षेत्राविषयी वाढलेले आकर्षण अविस्मरणीय आहे. फुटबॉलसाठी तेव्हाच्या काळात वाडेकर सरांनी दिलेले लाकडी बेसचे स्टड्स मला आजही आठवतात. तसे मी जंगलीदास महाराज यांना आदर्श मानतो. ते माझे गुरू. त्यांच्या आशीर्वादाने मी वाटचाल केली आणि प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, चिकाटीने मी यशस्वीही झालो. या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरू-शिष्य परंपरा कायम रहावी, गुरूंच्या अधिकारांवर कुठलेही बंधने नसावीत, शिष्यांनीही मर्यादा राखाव्यात, हा संदेश समाजात रूजणे गरजेचे वाटते. – रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी

व्हिजन दाखवणारे आई-वडील

बालवयात आई, वडिलांनी उत्तम संस्कार केल्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न बघता आले. संस्कारांचा शिक्षणाची जोड मिळाल्याने यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अधिकारी होण्यासाठी आई, वडिलांनी मोलाचे सहकार्य केले. कठोर परिश्रम करण्यासाठी नेहमी प्रेरीत केले. त्यामुळे मराठवाड्यासारख्या कायम दुष्काळग्रस्त भागातून शिक्षण घेतल्यानंतर राज्यभर काम करण्याचे बळ मिळाले आहे. नोकरीनिमित्त घरापासून दूर राहताना आई, वडिलांच्या आठवणींमधील काळ सातत्याने आठवतो. शिक्षणाविषयी व्यापक व्हिजन दाखवणारे आई, वडील हेच माझ्या आयुष्यातील खरे गुरु आहेत. – डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

मज देव भेटला

मी पाच वर्षाचा होतो. साधारणत: या वयात मुलं पहिलीत असतात. पण मी पहिली शिकलोच नाही. थेट दुसरीत प्रवेश घेतला. त्यावेळी मला शिकवण्यासाठी लता देव मॅडम आमच्या घरी येत.आयएएस ऑफिसर, जिल्हाधिकारी किंवा मोठा उद्योजक होण्याचे माझे स्वप्न होते. या स्वप्नाला देव मॅडमने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक मेहनत घेतली. माझी जडणघडण त्यापध्दतीने केली. साधारणत: ४० वर्षानंतर मी मराठी या वाहिनीवर प्रशांत दामले यांची माझी मुलाखत घेतली. त्यावेळी मी देव मॅडमची आठवण सांगितली. योगायोग असा की देव मॅडमने ही मुलाखत मुंबईत बघीतली. त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी ताबडतोब माझ्या ऑफिसचा फोन नंबर मिळवून संपर्क साधला. त्यांचा आवाज ऐकून मी देखील भरुन पावलो. मी दुसर्‍याच दिवशी त्यांना मुंबईत भेटायला गेलो. त्यावेळी आनंदाश्रू आवरणे आम्हा दोघांनाही अवघड झाले होते. आयुष्यातील पहिल्या गुरुची अर्थात देवासारख्या देव मॅडमची ही भेट सदैव स्मरणात राहील. – हेमंत राठी, प्रसिद्ध उद्योजक

..विचारांचा परीघ वाढला

पं. गोपीकृष्ण व पं. शमा भाटे हे माझे गुरु आहेत. पं. गोपीकृष्ण जगप्रसिद्ध असतानाही ते अत्यंत साधेपणा व आत्मियतेने शास्त्रीय संगीत शिकवत. ते क्लासेसला रोज १५ मिनिटे आधीच येत असत. संगीत नृत्याशी जोडले तर नृत्य प्रभावी ठरते असे अनेक पैलू पं. गोपीकृष्ण यांच्याकडून शिकायला मिळाले. पं. शमा भाटे यांच्या संगीत व नृत्याची ओळख, नृत्यानुभव मिळाला. त्यांच्यामुळे मोठे व्यासपीठ मिळाले. संगीताकडे बघण्याचा विचारांचा परीघ वाढला. – रेखा नाडगौडा, प्रतिद्ध नृत्यांगना