घरमहाराष्ट्रनाशिकएचएएल बनले राजकीय आखाडा

एचएएल बनले राजकीय आखाडा

Subscribe

नेत्यांच्या भेटीगाठीने बनला प्रचाराचा मुद्दा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एच.ए.एल कामगारांनी संपाचे हत्यार उपसल्याने कामगारांची सहानुभूती मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये येणार्‍या नेतेमंडळींही याच मुद्द्यावरून विरोधकांना कचाट्यात पकडण्यासाठी एच.ए.एल कामगारांची भेट घेत असल्याचे दिसून येते. या नेते मंडळीच्या दौर्‍यामुळे एचएएल सध्या राजकीय आखाडा बनला आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेतकरी आत्महत्या, औद्योगिक क्षेत्रात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले कारखाने या मुद्द्यांवरून विरोधकांकडून सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले जात आहे. वेतनकराराच्या मुद्द्यावरून सुखोई लढावू विमानांची निर्मिती करणार्‍या एच.ए.एल.कंपनीच्या नाशिकसह देशातील ९ विभागातील १९ हजार कामगारांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा पाचवा दिवस आहे. लढावू विमानांची देखभाल दुरूस्ती, तसेच हेलिकॉप्टरची बांधणी, विमानांचे ओव्हरहॉल आदी संरक्षण क्षेत्राशी निगडीत कामे एच.ए.एलमध्ये केली जातात. नाशिक येथील युनिटमध्ये साडेतीन हजार कायमस्वरूपी तर तीन हजार कंत्राटी कामगार काम करतात तर सुमारे दीड हजार लघुउद्योग या युनिटवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या ११ महिन्यांपासून लढा देवूनही कामगारांच्या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नसल्याने आता कामगारांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. एकीकडे बेरोजगारीची समस्या वाढत असताना सरकारच्या आडमुठेपणामुळे सरकार कंपनीतील कामगारांना संप करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडत एच.ए.एल कामगारांचा संप राज्यातील सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना एक आयती संधीच मिळाली आहे. यातून कामगारांची सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्नही आहेच हीबाबदेखील लपून राहिलेली नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने येणारे नेते मंडळी आवर्जुन एच.ए.एल. प्रवेशव्दारावर जावून कामगारांची भेट घेवून सरकारविरोधी गरळ ओकताना दिसून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कामगार संघटनांची भेट घेत संपाला पाठिंबा दर्शवला, तसेच सरकार दरबारी हा प्रश्न घेवून जाऊ, असे आश्वासनही दिले.

- Advertisement -

दरम्यान, एचएएलने या संपाविरोधात न्यायालयात धाव घेतली असून आपली बाजू मांडण्यासाठी एचएएल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पिंपळगाव बसवंत दिवाणी न्यायालयात एस. जी.कोरे यांच्या न्यायालयात हजर राहण्याबाबत संघनेला समन्स बजावण्यात आला आहे.

संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार : पवार

शुक्रवारी (दि.१८) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओझर येथे कंपनीच्या प्रवेशद्वारावर भेट देत कामगारांशी चर्चा केली. यावेळी पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी जे महत्वाचे निर्णय घेतले, त्यातील एचएएलचा कारखाना नाशिकला दिला. मी संरक्षण खात्याचे काम बघत असताना किती वर्षे आपल्याला काम मिळेल, देशाची गरज भागवू आणि इतर देशांची गरज भागविण्यासाठी प्रयत्न केले. देशाच्या संरक्षणाची गरज भागवण्याची जबाबदारी असल्याने कामगारांनी कधी आवाज उठवला नाही. कामगारांची क्षमता असतानाही सरकारने राफेलशी करार केला. कागदाचे विमान ज्यांनी बनविले नाही त्यांना लढाऊ विमानाचे काम दिले. कामगारांची मागणी रास्त आहे. व्यवस्थापनाने जी वेतनवाढ देवू केली आहे ती पुरेशी नाही. यासाठी निवडणुका संपताच संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत संरक्षणमंत्र्यांची आपण भेट घेऊ आणि आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -