मोदींनी टीका केलेला बडबोलपणा करणारा नेता कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सभेमध्ये राम मंदिरावरून 'बडबोले नेते' असा उल्लेख केलेला नेता कोण? यावर तर्क-वितर्क सुरू झाले असून त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडेच होता, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Nashik
I have come to greet Devendra Fadnavis said Narendra Modi
नाशिकमध्ये संबोधित करताना नरेंद्र मोदी

नाशिक येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत गेलेल्या एका बडबोलेपणा करणार्‍या नेत्यावर जाहीर टीका केली. हा बडबोलेपणा करणारा नेता कोण? याबाबत आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातला तो नेता कोण? याचा कयास लावला जात आहे. सभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘रखडलेल्या राम मंदिराबाबत एक नेता मागील वर्षी अयोध्येत गेला होता. तेथे त्याने उगाचच बडबोलेपणा केला’. नरेंद्र मोदींच्या या टीकेनंतर अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेना युतीत तणाव निर्माण झाला होता. युती होणार की नाही? अशी शंका येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात भाजप, सेनेने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालवले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह अयोध्येचा दौरा केला होता. शरयू नदीचे पूजन करताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराबाबत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. राम मंदिरासाठी अद्यादेश का काढत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली होती.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशिवाय राम मंदिरासाठी महाराष्ट्रातील एकही नेता अयोध्येत गेला नव्हता. त्यामुळे तेथे जाऊन बडबोलेपणा करण्याचा सवालच नव्हता. त्यामुळे बडबोलेपणा करणारा तो नेता कोण? याचे उत्तर प्रत्येकाने आपल्या परीने शोधून काढले आहे.


हेही वाचा – शरद पवार यांच्यासारख्या नेत्याकडून काश्मीरबाबत अपप्रचार-मोदी

नाणारवरून सेना-भाजपमध्ये वाजलं?

दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नाणार प्रकल्पावरून वाद पेटल्याचं दिसून येत होतं. ‘नाणारचं जे होणार, तेच आरेचं होणार’, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याला २४ तास देखील उलटत नाहीत, तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूरमध्ये बोलताना ‘नाणार रिफायनरी प्रकल्प व्हायलाच हवा’, असं जाहीर वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच सुनावलं होतं. त्यानंतर लगेचच आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची भूमिका फिरवत ‘जर जनतेला नाणार हवा असेल, तर शिवसेनेला काही हरकत नाही’, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली. नाणार प्रकल्पावरून शिवसेनेनं कट्टर विरोधाची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने नाणारसंदर्भातला निर्णय स्थगित केला होता.