राहुरीत शंभरावर ग्रामस्थांना विषबाधा

उपवासाची भगर खाल्ल्याने शेकडो ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना

food poisoning
प्रातिनिधिक फोटो

राहुरी तालुक्यात उपवासाची भगर खाल्ल्याने शेकडो ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. तालुक्यातील म्हैसगाव येथे शनिवारी राञी घडलेल्या या घटनेने चांगलीच धावपळ उडाली.

शनिवारपासून नवराञोत्सव सुरू झाल्याने उपवासाच्या पदार्थांची खरेदी वाढली आहे. तालुक्यातील म्हैसगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्थानिक दुकानदाराकडून भगर खरेदी केली होती. शनिवारी राञीच्या वेळेस भगर खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी, अतिसारचा त्रास जाणवू लागला. काही अनर्थ ओढावेल, या भितीने गावकर्‍यांनी मिळेल त्या दवाखान्यात उपचारासाठी धाव घेतली. रविवारी सकाळी विषबाधा झालेल्या गावकर्‍यांची संख्या १०० पर्यंत जावुन पोहचल्याने चांगलीच भिती निर्माण झाली होती.दरम्यान, अनेक गावकर्‍यांना विषबाधा झाल्याचे वृत्त मिळूनही रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत आरोग्य तसेच महसुल प्रशासनातील जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषात भर पडली.