पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू; दीड वर्षीय मुलगा पोरका

दीड वर्षाचा मुलगा झाला पोरका, सिन्नर तालुक्यातील घटना; तब्बल ११ तासांनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

Nashik
Death
प्रातिनिधिक छायाचित्र

शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन केलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, तिच्या पतीचाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, २३ एप्रिलला सकाळी घडली. या घटनेमुळे संबंधित दांपत्याचा अवघा दीड वर्षीय मुलगा मात्र पोरका झाला.

मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी पंचनामा सुरू असल्याचे सांगत सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ताटकळत ठेवल्याने नातेवाईक प्रचंड संतप्त झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी जालिंदर खताळे (२८, रा. पाटोळे, ता. सिन्नर) या महिलेचा सोमवारी, २२ एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर अश्विनी यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेले त्यांचे पती जालिंदर अर्जुन खताळे (३२) यांचाही दुसऱ्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्विनी व जालिंदर यांचा विवाह ३० जानेवारी २०१६ रोजी झाला होता. कार घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावेत, यासाठी जालिंदर व सासू द्रौपदाबाई अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याने या छळाला कंटाळून अश्विनीने रविवारी (ता. २१) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली. तिचे वडील भाऊसाहेब खैरनार (रा. चास ) यांनी सिन्नर पोलीसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला. जालिंदर स्वत: पोलीस ठाण्यात हजर होताच पोलिसांनी त्याला अटक केली.

जालिंदर याला सोमवारी दोडी उपजिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात सर्व तपासण्या सामान्य आल्या. मात्र, साडेनऊला जालिंदरला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने नगरपरिषद रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती ढासळल्याने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, त्याचा सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम एखंडे करत आहे.

सासरच्या भितीमुळे तणावात

जालिंदर खताळे हा पत्नीचा मृत्यू झाल्याने घाबरला होता. सासरकडील माणसे बरेवाईट करतील या भीतीने तो पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. पोलिसांनी त्याला नगरपरिषद रुग्णालयात दाखल केले. तरीही तो प्रचंड तणावाखाली होता. तणावामुळे व मन:स्थिती ढासळ्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांच्या आडमुठेपणामुळे नातेवाईकांचे हाल

नाशिकच्या सिव्हीलमध्येच शवविच्छेदनाची सुविधा असतानाही, केवळ नातेवाईकांचा गोंधळ होईल या भीतीने जालिंदर यांचा मृतदेह धुळ्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी यापूर्वीही मोठमोठ्या घटना कुशलतेने हाताळलेल्या असतानाही, पोलिसांनी सांगितलेले कारण हे न पटण्यासारखे आहे. मृतदेह नेण्यासाठी जालिंदर यांचे नातेवाईक सोमवारी सकाळीच नाशिकच्या सिव्हिलमध्ये आलेले होते. मात्र, नाशिक ते धुळे अंतर आणि शवविच्छेदनाचा वेळ यामुळे आधीच दुःखात असलेल्या या नातेवाईकांना सायंकाळपर्यंत अन्नपाण्यावाचून ताटकळत बसावे लागले. कडाक्याचे ऊन आणि दुःखाचा डोंगर अशा मनस्थितीतील नातेवाईकांचा पारा सायंकाळी सुटला आणि मृतदेह ताब्यात द्या नाहीतर आम्ही जातो, असा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी घाई करत मृतदेह ताब्यात दिला.

लहानग्याला आई-बाबांची प्रतिक्षा

अश्विनी व जालिंदर खताळे यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. या दोघांचाही मृत्यू झाल्याने मुलगा पोरका झाला. दिवसभर तो आई-बाबा कधी येतील, याची वाट बघत होता. त्याचा केविलवाणा चेहरा पाहून नातेवाईकांसह पाटोळे ग्रामस्थ प्रचंड अस्वस्थ झाले होते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here