घरमहाराष्ट्रनाशिकसरकार दरबारी स्क्रॅप; रस्त्यावर मात्र सुसाट

सरकार दरबारी स्क्रॅप; रस्त्यावर मात्र सुसाट

Subscribe

अधिकाऱ्यांच्या संगनमताने रिक्षामालकांचा उद्योग, स्क्रॅप रिक्षांचा सर्वाधिक वापर गुन्हेगारीसाठी

कालमर्यादा संपलेल्या रिक्षा थेट स्क्रॅप करण्याची कारवाई आरटीओ कार्यालयाकडून सुरू असली तरीही, नाशिकमध्ये मात्र मुदतबाह्य रिक्षा कागदोपत्री स्क्रॅप दाखवून त्यांचा गुन्हेगारीसाठी वापर होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खुद्द अधिकाऱ्यांच्याच संगनमताने ही बनवेगिरी सुरू असल्याने, अशा रिक्षा ‘चिरिमिरीच्या इंधना’वर सुसाट धावत आहेत.

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार प्रादेशिक परिवहन समितीने २० वर्षांहून अधिक कालमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा संपूर्ण स्क्रॅप करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अशा रिक्षा संपूर्ण स्क्रॅप करण्याची कारवाई सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सुमारे २ हजार रिक्षा स्क्रॅप केल्या जाणार आहेत. तर, अन्य एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार शहरात जेवढ्या अधिकृत रिक्षा आहे, तेवढ्याच अनधिकृत रिक्षा फिरत आहेत. त्यामुळे या आकडेवारीतील तफावत पाहता अधिकाऱ्यांची कृपादृष्टी लक्षात येते आणि नाशिककर किती असुरक्षित आहेत, याचाही अंदाज येतो.

- Advertisement -

१०-१२ हजारांत होते मांडवली

अधिकृतपणे एक रिक्षा जागेवर स्क्रॅप करण्यासाठी साधारण ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. मात्र, रिक्षा न आणताच ती केवळ कागदोपत्री स्क्रॅप झाल्याचे दाखवायचे असेल तर १० ते १२ हजार रुपये दिले जातात. रिक्षा स्क्रॅप झाल्याचे पत्र हाती आल्यानंतर रिक्षामालक कालबाह्य झालेली रिक्षा कोणतीही जबाबदारी न घेता २५ ते ३० हजारांपर्यंत रिक्षाच्या स्थितीनुसार विकून टाकतो. ही रिक्षा विकत घेणारा हा गुंड, गुन्हेगार आहे की बलात्कारी याचे त्याला काही सोयरसुतक नसते.

अशी होते बनवेगिरी

रिक्षा स्क्रॅप झाल्याचे पत्र हाती आले की, रिक्षामालक त्याची रिक्षा विकून टाकतो. हा व्यवहार करताना या रिक्षाचा क्रमांक असलेल्या परमिटची एक झेरॉक्सदेखील दिली जाते. जेणेकरुन पोलिस तपासणीतून सहीसलामत सुटता येईल. दुसरीकडे मूळ मालक विकलेल्या रिक्षाच्या पैशांत थोडे पैसे टाकून नवी रिक्षा विकत घेतो. पत्राच्या आधारे त्याच्याकडील परमिटवर नव्या रिक्षाचा क्रमांक टाकला जातो. अशा रितीने पोलिसांच्या लेखी परमिट्समध्ये वाढ झाल्याचे दिसत नसले तरीही, रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे.

- Advertisement -

या भागांत धावतात स्क्रॅप रिक्षा

शहरात रेल्वे स्टेशन रोड, जेलरोड, वडाळा गाव, भद्रकाली, मल्हार खाण, फुलेनगर, सातपूर या भागांत सर्वाधिक स्क्रॅप रिक्षांचा वापर होताना दिसतो. विशेषतः रात्री १० वाजेनंतर या रिक्षा रस्त्यावर निघतात आणि त्यातील अनेक रिक्षा या गुन्हेगारीसाठी वापरल्या जातात. याशिवाय महापालिका हद्दीतील गावठाण भागांमध्येही अशा रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

स्क्रॅप रिक्षांचे क्रमांक जाहीर करू

रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा अधिकृत की अनधिकृत हे समजावे, यासाठी स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे क्रमांक लवकरच जाहीर केले जातील. अशा रिक्षा आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, आम्हीदेखील आमच्या पातळीवर अशा रिक्षांविरोधात व्यापक कारवाई हाती घेऊ. – अशोक नखाते, एसीपी, शहर वाहतूक शाखा

थेट कारवाई व्हावी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत नाही, तोपर्यंत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच राहील. अनधिकृत रिक्षांविरुद्ध पोलिस व आरटीओ यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी. अशा मोहीमेत आढळलेल्या मुदतबाह्य रिक्षा थेट जप्त करून त्यांच्यावर बुलडोझर चालवावा. त्याचे भंगारदेखील परत करू नये. असे करतानाच, प्रामाणिक रिक्षाचालकांना चांगल्या सुविधा उपलब्ध द्याव्यात. – अभय कुलकर्णी, अध्यक्ष, नाशिक फर्स्ट

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -