नाशकात २०२३ मध्ये धावणार ‘मेट्रो निओ’

नाशकात २०२३ मध्ये  धावणार ‘मेट्रो निओ’

प्रायोगिक फोटो

मुंबईत मेट्रो धावली, पुणे, नागपुरातही मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. आता लवकरच नाशिकमध्येही या प्रकल्पाचा शुभारंभ होऊ घातला आहे. याकरता महामेट्रोकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून मेट्रोचा प्रस्तावित आराखडाही तयार करण्यात आला आहे. शहरातील ३१ किलोमीटरच्या मार्गावर बॅटरी व इलेक्ट्रिकवर आर्टिक्युलेटेड बस धावणार आहेत. २०२३ मध्ये मेट्रो निओ प्रत्यक्षात धावेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली.

मंत्रभूमी असणारी नाशिकनगरी मेट्रोसिटी म्हणून ओळखली जाणार आहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिककरांना मेट्रोचे गिफ्ट देण्यात येणार आहे. दोन ते तीन महिन्यांत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक परिवहन सक्षमीकरणासाठी रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम प्रणालीद्वारे ही प्रणाली कार्यरत होणार आहे. ही रेल्वे मेट्रो नसून टायर बेस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असेल. बॅटरी आणि इलेक्ट्रिकवर चालणार्‍या तीन बस एकमेकांना जोडलेल्या असतील. सुरुवातीला दोन मार्गांवर ही मेट्रो धावणार आहे.

या दोन्ही मार्गांना जोडणारा लूप बारदान फाटा ते श्रमिकनगर दरम्यान असणार आहे. या दोन मार्गांव्यतिरिक्त २८ किलोमीटरचा फीड रूटचा अवलंब केला जाणार आहे. यात पहिला रूट मुंबई नाका ते सातपूर व्हाया गरवारे हा १२ किलोमीटर आणि दुसरा मार्ग नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूरनाका १६ किलोमीटरचा असेल.

पहिला मार्ग

गंगापूर , शिवाजी नगर, श्रमिकनगर, महिंद्रा, शनैश्वरनगर, सातपूर कॉलनी, एमआयडीसी, एबीबी सर्कल, पारिजातनगर, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, गायत्रीनगर, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिकरोड रेल्वेस्टेशन असा २२ किलोमीटरचा मार्ग असेल.

दुसरा मार्ग

गंगापूर, जलापूर, गणपतीनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबईनाका असा १० किलोमीटरचा मार्ग असेल.

मेट्रोची वैशिष्ट्ये

* एलिव्हेटेड कॉरीडॉर

* २५ मीटर लांबीची बस

* एकावेळी २५० प्रवासी वाहतूक क्षमता

* ३१ किलोमीटरच्या मार्गावर २९ थांबे

* दोन जंक्शन असणार

* दोन मार्गांना जोडणारा लूप बारदान फाटा ते श्रमिकनगर दरम्यान

* रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमद्वारे होणार संचलन

* पहिल्या मार्गावर १९ थांबे, दुसर्‍या मार्गावर १० थांबे असतील.

First Published on: July 9, 2019 11:59 PM
Exit mobile version