महापौर, उपमहापौरांना तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा ‘बोनस’

डॉ. शोभा बच्छाव, दशरथ पाटील यांच्यानंतर मुदतवाढ मिळालेल्या भानसी या तिसर्‍या महापौर

Nashik

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौरांचे नशिब फळफळले असून त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. डॉ. शोभा बच्छाव आणि दशरथ पाटील यांच्यानंतर मुदतवाढीची लॉटरी आता रंजना भानसी यांची लागली आहे.

दिनांक 14 मार्च 2017 रोजी महापौ रंजना भानसी आणि उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. निवड होताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित पदाधिकार्‍यांना केवळ सव्वा वर्षांचा कालावधी देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार संबंधितांकडून त्यांनी राजीनामे देखील लिहून घेतले होते. मात्र सव्वा वर्षांच्या कालावधीनंतर ैआपले पद सोडायला कुणी तयार नव्हते आणि तसा प्रयत्नही पक्षाच्या वतीने करण्यात आला नाही. त्यामुळे भानसी आणि गिते यांनी सव्वा महिन्याचा कालावधी उपभोगला.

महापौर भानसी व उपमहापौर गिते यांचा कालावधी 15 सप्टेंबर 2019 रोजी संपणार होता. परंतु, त्याआधीच राज्य शासनाने विधानसभा निवडणूक होईपर्यंत महापालिकेच्या महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्याचा कालावधी वाढीव मिळणार आहे. यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. असे असले तरी नवीन अडीच वर्षांचा कालावधी मिळणार्‍या महापौर व उपमहापौरांचा हा तीन महिन्यांचा कालावधी मात्र कमी होणार आहे. यापूर्वी डॉ. शोभा बच्छाव आणि दशरथ पाटील यांना वाढीव कालावधी मिळाल होता. यापैकी डॉ. बच्छाव यांच्या कार्यकाळापासूनच राज्य शासनाने महापौर व उपमहापौर यांचा कालावधी अडीच वर्ष करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शोभा बच्छाव यांना शासनाच्या निर्णयाचा फायदा मिळाला होता. त्यानंतर आता महापौर भानसी यांना तीन महिने का होईना परतुं, वाढीव कालावधी मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यानंतर ऑक्टोबरअखेर विधानसभा निवडणुका होऊ शकतात.यामुळे नोव्हेंबरपर्यंत महापौरपदी रंजना भानसी व उपमहापौरपदी प्रथमेश गिते हे विराजमान असतील.