घरमहाराष्ट्रनाशिकसमृद्धी महामार्गाला ‘एसएमबीटी’जवळ इंटरचेंज

समृद्धी महामार्गाला ‘एसएमबीटी’जवळ इंटरचेंज

Subscribe

९.५ हेक्टर जमीन संपादित करणार, आठवडाभरात मूल्यांकन प्रक्रिया

समृद्धी महामार्ग प्रकल्पाअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथे एसएमबीटी महाविद्यालय अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर जवळील इंटरचेंन्जसाठी 9.5 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमिनीचे मूल्यांकन येत्या आठवडाभरात हाती येईल. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीची परवनगी घेऊन जमीन संपादित केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रकल्प समन्वयक विठ्ठल सोनवणे यांनी दिली.

नागपूर- मुंबई या ७१० किलोमीटर समृद्धी महामार्गासाठी इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील सुमारे १२०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाला दहा जिल्ह्यांमध्ये इंटरचेंजेस दिले जाणार आहेत. मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडताना या शहरांमधील ३९० हून अधिक गावांना या महामार्गाचा थेट फायदा पोहोचणार आहे. इतर १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे या महामार्गाचा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गाची आरेखन प्रक्रिया पूर्ण करताना प्रस्तावित इंटेरचेंजेसचा ही विचार करून १० जिल्ह्यातील कुठल्या ठराविक ठिकाणी इंटरचेंजेस बांधले जाऊ शकतात, अशा जागा महामंडळातर्फे निश्चित करण्यात आल्या आहेत. पॅकेज ४ मधील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण ४ इंटरचेंजेस प्रस्तावित आहेत. हे इंटरचेंजेस डायमंड, क्लोवरलिफ, ट्रम्पेट या आकाराचे असून नगर- मनमाड रोड, नाशिक-पुणे रोड आणि घोटी- भंडारदरा रोड येथे बांधकाम प्रस्तावित आहे. या पॅकेजमधील इंटरचेंज हे १० क्रमांकाच्या राज्य व ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातील. नाशिकमधून जाणार्‍या या महामार्गासाठी एसएमबीटीजवळ समृद्धीला छेद देत इंटरचेंन्ज तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

भविष्यात भरवीर खुर्द येथील एसएमबीटी महाविद्यालय व रिसर्च सेंटरचे अपग्रेडशन करून ट्रॉमा केअर सेंटर बनवण्याचा सरकारचा मानस आहे. ठाणे ते सिन्नरदरम्यान, समृद्धी प्रकल्पातील अपघातातील जखमींना या सेंटरमध्ये तत्काळ उपचार मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे. या इंटरचेंजसाठी साडेनऊ हेक्टर जमीन संपादनासाठीची अधिसूचनाही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्ध केली. जमीन मूल्यांकनाचे काम सध्या सुरू असून येत्या आठ दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. जमीन मालकांना सध्याच्या बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जाणार आहे. जमीन संपादनाचे हे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी प्रशासन आग्रही आहे.

इंटरचेंजचा फायदा

इंटरचेंजेसच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे रस्ता ओलांडताना वाहतुकीला होणारा अडथळा दूर होऊन महामार्गाचा आजूबाजूच्या शहरांशी किंवा गावांशी थेट, पण सुरक्षित संपर्क होऊ शकेल. समृद्धी महामार्गाला जिथे जुने राज्य व राष्ट्रीय महामार्ग छेदतात, अशा २० हून अधिक ठिकाणी या इंटरचेंजच्या माध्यमातून सुलभ वाहतुकीसाठी व्यवस्था उभी केली जाणार आहे. महामार्गावर प्रवास करणार्‍या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना महामार्गावर यायचे असल्यास किंवा महामार्गावर प्रवास करणार्‍यांना बाहेर पडायचे असल्यास इंटेरचेंजचा एकमेव सुरक्षित व सुलभ पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

स्फोट करताना सुरक्षितता बाळगा

सिन्नर तालुक्यातील वावी येथे दगडखाणीत सोमवारी (दि.24) प्रकल्पाच्या ठेकेदारामार्फत स्फोट करण्यात आले. या स्फोटात एक दगड उडून 700 मीटर दुरवर घरावर जाऊन पडल्याने तेथे नुकसान झाले. ठेकेदाराने संबंधित व्यक्तीला आर्थिक नुकसान भरपाई दिली आहे. यापुढे स्फोट करताना काळजी घेण्याचे आदेशही संबंधित ठेकेदाराला दिल्याची माहिती विठ्ठल सोनवणे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -