नाशिकमधील ‘HAL’ची पाकिस्तानच्या ‘ISI’कडून हेरगिरी, एचएएलच्या कर्मचाऱ्याला अटक

दहशतवादविरोधी पथकाने केली एका कर्मचार्‍यास अटक

प्रातिनिधीक फोटो

भारतीय लष्कराचे प्रमुख केंद्र असलेल्या देवळाली कॅम्पच्या प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीतील एका कर्मचार्‍याने विमान कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने संशयिताला अटक केली असून त्याच्या ताब्यातून ३ मोबाईल, ५ सिमकार्ड, २ मेमरी कार्ड जप्त केले आहेत.

नाशिकमधील एक व्यक्ती परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्या संबंधित संवेदनशील माहिती आणि एचएएल या विमान कारखान्यासंदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्तीस पुरवत असल्याची खबर दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक युनिटला लागली होती. त्यानुसार पथकाने चौकशी केली असता ओझर येथील एचएएल कारखान्यातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.

हा संशयित भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशील, एचएएल कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती आयएसआयला पुरवित असल्याचेही पुढे आले. पथकाने तातडीने कारवाई करत संशयिताला अटक केली. त्याच्या ताब्यातून ३ मोबाईल, ५ सिमकार्ड, २ मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. हे साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहे. संशयिताला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.