‘कडकनाथ’ फसवणुकीचे लोण नाशिकमध्ये

कुक्कुटपालनातून कोट्यवधींना गंडा; ‘महारयत’च्या चौघांवर गुन्हे

Nashik

शेतीशी जोडधंदा म्हणून आलिशान कार्यालय थाटून महारयत कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून मालामाल करण्याचे आमिष दाखवत राज्यासह नाशिकमधील शेतकर्‍यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. कुक्कुटपालन व्यवसायातील फसवणुकीचे लोण आता नाशिकमध्येही आले आहे. फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊ लागल्याने व संचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने १९ शेतकर्‍यांनीदेखील फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कडकनाथ कोंबडीची जात मध्यप्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. वैद्यकीयदृष्ठ्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले जात आहे. ही कोंबडी काळी असून तिचे रक्त व मांसही काळे असल्यामुळे या कोंबडीचे खवय्यांना आकर्षण वाटते. महारयत कंपनी दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील कडेगाव व वाळवा तालुक्यातील काहीजणांनी स्थापना केली. सांगली, कोल्हापूर, नाशिकसह राज्यभर आलिशान कार्यालये सुरु केली. ७५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत ३०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी घ्या आणि अवघ्या १० महिन्यात किमान ३ लाख ५० हजार रुपये मिळवा, अशी योजना आखून तिचा प्रसार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेतीस जोडधंदा म्हणून शिवदास भिकाजी साळुंखे (रा. सैय्यद प्रिंप्री. ता.नाशिक) यांनी २५ मे २०१९ रोजी महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीच्या विराज टॉवर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथील कार्यालयात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केली. महारयत कंपनीच्या नाशिक कार्यालयातील कर्मचार्‍यांनी साळुंखेची यांची १३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सुरुवातीला शेतकर्‍यांना योजनेनुसार लाभ मिळाला. मात्र, आता कंपनीची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कोंबड्यांची व अंड्यांची खरेदी नाही, औषधे नाही आणि पैसेही नाही, अशा चक्रव्यूहात गुंतवणूकदार शेतकरी अडकले आहेत. कुक्कुटपालन व्यवसायात महारयत कंपनीकडून सुमारे आठ हजार शेतकर्‍यांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कंपनीने राज्यभरात सुमारे ८ हजार गुंतवणूकदारांची ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकली आहे. गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने कार्यालयांमधील कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली आहेत.

संचालकांवर गुन्हे

सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या १९ गुंतवणूकदार शेतकर्‍यांनी सोमवारी (ता.९) कंपनीच्या चार संचालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे, संदीप सुभाष मोहिते (सर्वजण रा.इस्लामपूर, जि.सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तपास सुरू आहे.

फसवणूक झालेल्या १९ शेतकर्‍यांनी तक्रार दाखल केली आहे. महारयत कंपनीने कशाप्रकारे फसवणूक केली, कोणी केली आहे. त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे.