वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारातील रायगडनगरजवळ भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेली अडीच वर्षांची प्रौढ मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन शवविच्छेदन केल्यानंतर गंगापूर रोपवाटिकेत बिबट्या मादीचे दहन केले.

अशी घडली घटना

नाशिक जिल्ह्यातील महामार्गांवर वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने वन्यजीवांना जीव गमवावे लागत आहे. जिल्ह्यात १५ दिवसांत एका बछड्यासह दोन बिबटे मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर असतो. या परिसरात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे. रात्रीच्या वेळी बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्न करतात. मात्र, भरधाव वाहनांमुळे बिबट्यांना जीव गमवावा लागल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

गंगापूर रोपवाटिकेत मादीचे मृतदेहाचे केले दहन

गुरुवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी रस्ता ओलांडत होती. हा रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून नाशिककडे जाणार्‍या भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत मादीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जागरूक वाहनचालकांनी नाशिक शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून तत्काळ नाशिक पश्चिम विभागाचे वनपाल मधुकर गोसावी यांना अपघाताबद्दल माहिती दिली गेली. माहिती मिळताच गोसावी हे त्यांच्या वनरक्षकांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मादीचा मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला. गुरूवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर गंगापूर रोपवाटिकेत मादीचे मृतदेहाचे दहन केले.


Video : चंद्रपूरमधील शिवना नदी पात्रता अडकला वाघ