प्रभाग २९ मधील पाण्यासह रस्त्यांचे प्रश्न सोडविणार

महापौर आपल्या प्रभागात उपक्रमात सतीश कुलकर्णी यांची घोषणा

nashik

प्रभाग क्रमांक २९ मध्ये कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यापुढील काळात सुरळीत करून प्रभागात सलग तीन तास पुरेसे पाणी मिळेल याबाबत महापालिकेच्यावतीने नियोजन करण्याची ग्वाही महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत प्रभाग क्र. २९ मध्ये महापौरांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी साईबाबा नगर परिसराचे रस्ते काँक्रिटीकरण करून परिसरातील मैदानाला व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करणे, नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून रस्त्यांची उंची कमी करणे आदी आश्वासनेही महापौरांनी दिली.
पवन नगर येथील महाकाली मैदानाच्या सभागृहात शनिवारी (दि.२५) नागरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना महापौरांनी सांगितले की, वर्षभरात पालिकेच्या वतीने मूलभूत सुविधा रस्ते, पाणी, स्वच्छता याबाबत बदल झालेला शहरवासियांना दिसेल. यावेळी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की कचरा हा वर्गीकरण करून घंटागाडीच टाकावा. मनपाच्या वतीने लवकरच सवय बदला नाशिक बदलेल असा बॅनर लावून जनजागृती केली जाणार आहे. शहरातील नाले हे फक्त पावसाळ्यातील चार महिनेच वाहतील याबाबत महापालिकेच्या वतीने दक्षता घेण्यात येणार आहे. गोदावरी स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कार्यक्रमात नगरसेविका छाया देवांग, रत्नमाला राणे, नगरसेवक मुकेश शहाणे, निलेश ठाकरे आदी उपस्थित होते. हेमंत पवार, किरण जगताप, जयश्री धारणकर, वनीता पाठक, सुभाष घरटे, मिराबाई कवडे, गणेश चौक गृहनिर्माण संस्था, स्वामी विवेकानंद परिसर, भाटिया , रतिलाल पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ सुनील बुकाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन रावते, कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे, पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी, उपअभियंता रौदळ, नितीन पाटील, गोकुळ पगारे, प्रवीण थोरात, जीवशास्त्रज्ञ डॉ त्रंबके आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर साईबाबा नगर मैदान, हिरामन गायकवाड सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळा मैदान आदी भागाची महापौरांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

नागरिकांनी मांडल्या या समस्या-

परिसरात ग्रीन जिम करावी, बाकडे बसवण्याची व्यवस्था करावी, पावसाळी नालेसफाई व्हावेत, परिसरातील भुयारी गटारी तुंबू नये अशी व्यवस्था करावी, परिसरात जास्त दाबाने पाणीपुरवठा व्हावा, बंद पथदीप दुरुस्त करण्यात यावेत, पाणी येण्याची व जाण्याची वेळ बदलावी, परिसराची स्वच्छता दूर होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, ठाकरे सभागृह खुले करावे, विवेकानंद पुतळा येथे वाचनालय करून त्या मोकळ्या मैदानात कंपाउंड करावे, त्या ठिकाणी ग्रीन जिम करावी,सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करावी,वीज वितरण कंपनीची असणारी डीपी धोकेदायक असून ती जागा बदलावी, विजतारा भूमिगत कराव्यात,जॉगिंग ट्रॅकवर साऊंड सिस्टिम बसवावी.

आजपासून सुरु होणार महापौर अ‍ॅप:

२६ जानेवारी पासून महापौर अ‍ॅप सुरू करण्यात येत असून त्यावर नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंद करण्याबाबत यावेळी आवाहन करण्यात आले.
महापौरांनी दिलेली आश्वासने
– छोट्या स्वरूपाच्या धूर फवारणी मशीनची संख्या वाढविणार
– १ मार्चपर्यंत मोकाट जनावरांच्या त्रासातून मुक्तता देणार
– स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळील मैदानास संरक्षण भिंत बांधून जेष्ठ नागरिकांसाठी शेड उभारणार
– भुयारी गटार वारंवार तुंबू नये म्हणून प्रशासन दक्षता घेणार
– साईबाबा नगर परिसरातील रस्ते काँक्रीट करणार
– या परिसरातील मोकळ्या मैदानात ग्रीन जिम करणे, पेव्हर ब्लॉक बसवणार
– दारूच्या दुकानाचा प्रश्न नगरसेवक व पोलिस यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येईल