मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे बंदच राहणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Nashik

‘पुनश्च हरिओम’ (मिशन बिगीन अगेन) करत शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या असल्या तरी, याबाबत प्रत्येक जिल्हयात जिल्हाप्रशासन आणि महापालिका प्रशासनाला तेथील परिस्थितीचा अंदाज घेउन धोरण ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानूसार नाशिक जिल्हयात कोणतीही नविन सवलती देण्यात येणार नाही असे स्पष्ट करतांनाच मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे बंदच राहणार असल्याचे सांगत इतर सवलती मात्र राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानूसार लागू राहतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलतांना स्पष्ट केले.

केंद्र सरकारने शनिवारी देशभरात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची घोषणा केली आहे. राज्यात अनलॉकचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होईल, दुसरा टप्पा ५ जूनपासून तर तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊन ५.० मध्ये नियम मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीमुळे नाशिककरांमध्ये लॉकडाउनबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. नेमक्या कोणत्या सेवा सुरू होणार, कोणत्या सेवा बंद राहणार याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, जिल्हयात आजपर्यंत ज्या पध्दतीने सवलती देण्यात आल्या आहेत त्या पुढे कायम राहतील. केंद्राने ८ जूननंतर धार्मिक स्थळे, हॉटेल्स, रेस्टॉरंट शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी नाशिकमध्ये मात्र या सेवा आणि धार्मिक स्थळे मात्र बंदच ेठेवण्यात येणार आहे. सर्व दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत असेल. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू होणार नाहीत. कंटेनमेंट झोन कुठे कसे असतील, हे ठरवण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनपा प्रशासन घेणार निर्णय
बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी शहरातील दूकाने सम विषम तारखेला सुरू ठेवण्यात येतील असे निर्देश देण्यात आले आहे. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुसर्‍या बाजूची दुकाने दुसर्‍या दिवशी सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या तारखा कोणत्या असतील याबाबत महापालिका प्रशासन निर्णय घेईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

अशी आहे नियमावली
* सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.
* धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स बंदच राहतील
* जिल्हयांतर्गत बससेवा ५० टक्के क्षमतेसह सुरू राहील
* शहरांतर्गत बससेवा बंद राहील.
* सलून, स्पा, ब्युटी पार्लर, बंदच राहणार.
* रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंंत संचारबंदी असेल.
* चित्रपटगृहे, जिम, तरणतलाव, उद्याने, नाटयगृह बंदच राहतील.
* जिल्हाबाहेर प्रवासासाठी ई पास बंधनकारकच.