घरमहाराष्ट्रनाशिकमाणिकराव कोकाटेंकडून भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीकडे चाचपणी

माणिकराव कोकाटेंकडून भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीकडे चाचपणी

Subscribe

कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवायचीच अशी खुणगाठ मनाशी बांधून तयारीला लागलेल्या सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपसह आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चाचपणी केल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवायचीच अशी खुणगाठ मनाशी बांधून तयारीला लागलेल्या सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपसह आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चाचपणी केल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वीच कोकाटे यांनी मातोश्रीवरही हजेरी लावून चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे शिवसेैनिकांचीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपमधील एक गटही कोकाटेंच्या समर्थनार्थ कार्यरत झाला आहे. या बदलत्या घडमोडींमुळे नाशिकचे राजकारण ढवळून निघाले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माजीमंत्री छगन भुजबळ यांची संभाव्य उमेदवारीची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी तेवढ्याच सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात सिन्नरची जागा शिवसेनेला जाणार असल्याने कोकाटे यांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे कुठल्या परिस्थितीत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. त्यामुळेच की काय कोकाटेंनी आता विविध पर्यायांचा शोध सुरू केला आहे. तीन दिवसांपूर्वी कोकाटेंनी काही शिवसैनिकांसह मातोश्रीवरही हजेरी लावल्याचे समजते. नाशिकमधून निवडून आलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा राजकिय इतिहास असून याबाबत मातोश्रीवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. कोकाटे हे आक्रमक नेते असून भुजबळांशी सामना करण्यासाठी कोकाटे हेच उमेदवार योग्य असल्याचेही मातोश्रीला पटवून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, भाजपमधीलही एक गट कोकाटेंच्या उमेदवारीबाबत आग्रही असून याकरीता मुंबई येथे भाजप कार्यालयात काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आल्याचेही वृत्त आहे. याला भाजपचे तिनही आमदारांचे समर्थन असल्याचेही समजते. त्यामुळे जागावाटपात नाशिकची जागा भाजपला सोडावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. भुजबळ आणि कोकाटे यांच्यातील संघर्ष पाहता राष्ट्रवादीला कोकाटे यांना स्विकारेल, अशी परिस्थिती सध्या नसली तरी भुजबळ बाहेर आल्यानंतर कोकाटेंनी त्यांची भेट घेऊन संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोकाटेंच्या ‘कुछ भी हो सकता हेै’ हे सूचक वक्तव्य बरेच काही सांगून जाते. मात्र, यामुळे नाशिकच्या राजकारणात नजिकच्या काळात उलथापालथ होण्याची शक्यता बळावली आहे.

- Advertisement -

आतली बातमी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी जवळीक असल्याने राणेंबाबत शिवसेना कोकाटेंना स्वीकारेल का असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी, कोकाटेंना सेनेत प्रवेश देत राणेंना धक्का देण्याचे तंत्र शिवसेना अवलंबवू शकते. शिवसेनकडूनही कोकाटेंसाठी एक गट सक्रिय आहे. गत निवडणुकीत कोकाटेंनी भुजबळांविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे बंड थोपवण्यासाठी भुजबळांनी थेट माजी मंत्री नारायण राणेंचीच सिन्नरमध्ये सभा घेत कोकाटेंचे बंड थोपवले होते. त्यामुळे भुजबळांकडून कोकाटेंना पक्षप्रवेशाबाबत हिरवा कंदील मिळेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -