घरमहाराष्ट्रनाशिकयेवलेकरांना मांजरपाडा कोसो दूर

येवलेकरांना मांजरपाडा कोसो दूर

Subscribe

पुणेगावमधून केवळ ६३ किलोमीटरपर्यंत पाणी; डोंगरगाव बंधार्‍यात येण्यासाठी लागणार दोन महिने

मांजरपाडा योजना पूर्ण झाल्यानंतर त्याचे जलपूजन करून श्रेय लाटण्यासाठी नाशिकच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. मात्र, मांजरपाडा योजनेतून पुणेगाव धरणात सोडलेले पाणी पुढे दरसवाडी-डोंगरगाव धरणांत सोडण्यासाठी कालव्याची वहन व्यवस्था अत्यंत तुटपुंजी असल्याचे पहिल्याच वर्षी समोर आले आहे. सध्याच्या कालव्यातून हे पाणी येवला तालुक्यातील साठवण तलावात पोहोचण्यासाठी किमान दोन महिने लागतील. यामुळे येवल्यापर्यंत पाणी पोहोचवायचे असेल तर कालव्यांची क्षमता किमान दुप्पट करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.
कायम दुष्काळी असा शिक्का बसलेल्या येवला व चांदवड तालुक्यातील जनतेने वर्षानुवर्षे दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे स्वप्न बघितले. यावर अनेक निवडणुका लढल्या व राजकारणही झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी येवल्यातून निवडणूक लढवल्यानंतर मांजरपाडा प्रकल्प साकारण्यास वेग आला. सुरगाणा तालुक्यातील देवसाने येथे वळणबंधारा बांधून बोगद्याद्वारे ते पाणी पुणेगाव धरणात सोडणे, असा तो प्रकल्प आहे. त्याला २००६ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अनेक वर्षे रखडल्यानंतर यावर्षी बोगद्याचे काम पूर्ण होऊन त्यातून पुणेगाव थरणात पाणी पडले. मांजरपाडा धरणासाठी जलसंपदा विभागाकडून निधी मिळवण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागल्यामुळे त्याच्यावरील कालव्यांच्या वहनक्षमतेचा कुणीही विचार केला नाही. पूर्वी पुणेगाव धरणातून पूर पाणी आणण्याच्या हेतुने सध्याच्या दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याची रचना केली असून त्याचीही कामे अनेक ठिकाणी अर्धवट आहे. यामुळे पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे ५ ऑगस्टपासून सोडलेले पाणी आतापर्यंत केवळ ६३ किलोमीटरपर्यंत आले असून चांदवड तालुक्यातील परसूल, भोयेगाव परिसरातील जवळपास सहा बंधारे भरून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

सध्या २१० क्युसेक क्षमतेच्या कालव्याच्या मुखाशी पाण्याचा वेग १०० क्युसेक असून भोयेगाव धरणाजवळ केवळ १५ क्युसेक आहे. दरसवाडी बंधार्‍यापर्यंत अद्याप पाणी पोहोचले नसतानाच पुणेगाव धरण ८५ टक्क्यांवर आले आहे. पश्चिम भागातील पाऊस उघडल्यामुळे या धरणातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता कमीच असल्यामुळे दरसवाडीपर्यंतही पाणी पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. आतापर्यंत केवळ १२५ दलघफू पाण्याचा विसर्ग झाला आहे. पुणेगाव धरण ६२३ दलघफू क्षमतेचे असून मांजरपाडा प्रकल्पातूनही ६०६ दलघफू पाणी पुणेगाव धरणात सोडण्याची योजना आहे. पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रातून धरणात पाणी येण्याचा कालावधी हा साधारणपणे महिनाभराचा असतो. त्यातील निम्मा कालावधी धरण पूर्ण भरण्यातच जातो. धरण पूर्ण भरल्याशिवाय कालव्यातून पाणी सोडले जात नसल्यामुळे दरसवाडी पोहोच कालव्याद्वारे जास्तीत जास्त १५ ते २० दिवस पाणी सोडले जाऊ शकते. या सर्व बाबींचा विचार केल्यास मांजरपाडा धरणातून येणारे संपूर्ण पाणी कालव्यातून वहन करायचे असल्यास त्याची वहन क्षमता किमान ४०० क्युसेक असणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन व मोठ्या आकाराचा कालवा झाल्याशिवाय पुणेगावपासून जवळपास १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव बंधार्‍यापर्यंत पाणी पोहोचणे केवळ मृगजळ ठरणार आहे.

नियोजन शून्यतेचा नमूना

मांजरपाडा वळण योजनेचे ६०६ दलघफू पाणी बोगद्यातून आणल्यानंतर ते चांदवड-येवल्याला पुढे जाण्यासाठी तेवढ्या क्षमतेचा कालवा पाहिजे किंवा पाणी साठवण्याची स्वतंत्र सुविधा पाहिजे होती. मात्र, ते पाणी ६२६ दलघफू क्षमतेच्या पुणेगाव धरणात टाकण्याचा विचार म्हणजे जलसंपदा विभागाच्या नियोजन शून्यतेचा नमूना असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

दृष्टीक्षेपात दरसवाडी-डांगरगाव पोहोच कालवा

  • कालव्याची लांबी : १५० किलोमीटर
  • वहन क्षमता : २१० क्युसेक
  • दरसवाडी भरण्यासाठीचा काळ : ३० दिवस
  • डोंगरगावला पोहोचण्यासाठीचा काळ : तीन महिने

मुखाजवळ वहन क्षमता ४०० पेक्षा अधिक असली, तरच येवल्याला पाणी येणे शक्य

दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याची सध्याची वहन क्षमताही केवळ पुणेगावमधून येणारे पूरपाणी गृहित धरून केलेली आहे. मात्र, मांजरपाडा योजनेतून वेगळे ६०६ दलघफू पाणी या कालव्यातून कमीत कमी दिवसांत वाहून नेण्यासाठी मुखाजवळ वहन क्षमता ४०० पेक्षा अधिक असली, तरच येवल्याला पाणी येणे शक्य आहे. – साहेबराव सैद-पाटील, निवृत्त कार्यकारी अभियंता, येवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -