घरमहाराष्ट्रनाशिकशाबासकीची थाप नको, परवानग्यांच्या नावाने उत्सवात विघ्न आणू नका

शाबासकीची थाप नको, परवानग्यांच्या नावाने उत्सवात विघ्न आणू नका

Subscribe

गणेश मंडळ पदाधिकार्‍यांची महापौर, आयुक्तांसमोर भावना

काश्मिरमध्ये कलम ३७० सरकारने रद्द केले, पण महापालिकेतील कारभारी मात्र गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर कलम ३२० लावण्यासाठी उत्सूक असतात. एखाद्या दहशतवाद्यांसारखी वागणूक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिली जाते. साहेब आम्हाला शाबासकीची थाप नको.. पण बाप्पाच्या उत्सवात नियमांच्या अतिरेकाचे विघ्न आणू नका, अशा भावना नाशिकमधील गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेत शुक्रवारी (ता. २३) आयोजित केलेल्या बैठकीत मांडल्या. मंडळांकडून घेण्यात आलेली अनामत रक्कमही प्रशासन परत देत नाही, असा खळबळजन दावाही यावेळी पदाधिकार्‍यांनी केला.

महापालिकेच्या वतीने आयोजित या बैठकीत पदाधिकार्‍यांनी महापौर, आयुक्त आणि अन्य पदाधिकार्‍यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. नवरत्न मंडळाचे सचिन डोंगरे यांनी मंडळांवर महापालिकेच्या वतीने लादण्यात येणारे कर रद्द करण्याची मागणी केली. भद्रकाली पिंपळचौक मित्रमंडळाचे बबलूसिंग परदेशी यांनी महापालिका मंडळाच्या पदाधिकार्‍यांना गुन्हेगारासारख्या मोठमोठ्या नोटीसा पाठवते. अशा नोटीसा पाठविणे बंद करण्याची मागणी केली. कलम ३७० रद्द झाले, मात्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर महापालिकेच्या वतीने केली जाणारी ४२० कलमाची कारवाई मात्र थांबली नाही असे मदन दायमा यांनी सांगितले. कृत्रीम तलावांची व्यवस्था चांगल्या पध्दतीने करावी असे लक्ष्मण धोत्रे यांनी सांगितले. महापालिकेने गणेश मंडळांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करुन ठेवावी अशी मागणी स्वप्नील घिया यांनी केली. गोदाघाटाच्या स्वच्छतेवर भर देण्याची मागणी नंदू कहार यांनी केली.

- Advertisement -

पडके वाडे जरा सांभाळा- शेटे

नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे म्हणाले की, जुने नाशिक भागात पडके वाड्यांचा प्रश्न यंदा अधिक गंभीर असून सुरक्षीतपणे भाविकांना देखावे बघता येतील यासाठी महापालिकेने खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे जुने नाशिक भागातील रस्ते हे सहा आणि सात मीटरचेच आहेत. त्यामुळे या भागात रस्त्यातच मंडप टाकावे लागतात. या जुन्या परंपरेला नियमांच्या नावाने अडथळा आणू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आम्हाला महापौर ताईंची गरज; भाऊंची नाही-

दंडे हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी नंदन भास्करे यांनी विसर्जन मिरवणुकीच्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित करीत शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांनी नारळ फोडून मिरवणचकीला प्रारंभ करावा, भाऊंची वाट बघत बसू नये. आम्हाला ताईंची गरज आहे भाऊंची नाही असा टोला पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता लगावला.

महत्वाच्या सूचना

  •  मंडळांनी देखाव्यांवर खर्च करण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करण्यावर भर द्यावा- उध्दव निमसे
  • मंडप धोरण, ध्वनीक्षेपकाचा मुद्दा आदींबाबत नाशिककरांनी एकत्र येऊन पुन्हा जनहित याचिका दाखल करावी-जगदीश पाटील
  • मंडळांना बक्षीसे देण्याऐवजी हा निधी पूरग्रस्तांसाठी द्या- रामसिंग बावरी
  • गणेशोत्सव काळात लोकमान्य टिळकांचा पुतळा महाबळ चौकात तात्पुरत्या स्वरुपात का होईना उभारण्यात यावा- शंकरराव बर्वे
  • उत्सवाच्या निमित्ताने स्वच्छ नाशिकची जागृती मंडळांच्या माध्यमातूनही करावी- विनायक वाघमारे
  • डेंग्यु आणि मलेरिया आजाराविषयीच्या जनजागृतीची पत्रके मंडळांना वाटण्यासाठी द्यावीत- नंदन भास्करे
  • विसर्जनाच्या दिवशी गोदावरीत पूरपरिस्थिती नसेल याची काळजी उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच घ्यावी- हेमंत जगताप
  • मंडळांनी शॉर्टकट न मारता पंचवटीकरांनाही मिरवणुकीचा आस्वाद घेऊ द्यावा- पदमाकर पाटील

अहो आश्चर्यम.. बैठकीत अशीही चर्चा-

  •  महापालिकेच्या अर्थसंकल्पात गणेशोत्सव मंडळांसाठी २ टक्के तरतूद करा
  • स्थायी समितीने प्रत्येक मंडळाला वर्गणी देण्याची व्यवस्था करावी
  • एका पदाधिकार्‍याने सांगितले की, लोकमान्य टिळक मला भेटले आणि म्हणाले कशाला हवे उत्सवात नियम?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -