महापालिका कर्मचार्‍यांचे ८ फेब्रुवारीचे आंदोलन स्थगित

आयुक्तांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर संघटना पदाधिकार्‍यांची नरमाईची भूमिका

nashik
Rajiv-gandhi-bhavan-NMC
नाशिक महापालिका

महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या २६ मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्याने ८ फेव्रुबारीला करण्यात येणार्‍या आंदोलनास तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय संबंधित संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. यानंतरही मागण्या पूर्ण न केल्यास सर्व संघटनांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरविण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांनी यावेळी जाहीर केला.

महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, पदोन्नती, बायोमेट्रिक हजेरी बंद करणे, सफाई कर्मचार्‍यांना घरकुल मंजूर करणे, शैक्षणिक अर्हतेनुसार कर्मचार्‍यांच्या वारसांना नियुक्ती देणे यासह विविध 26 मागण्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेसह मनपातील सर्व कर्मचारी संघटनांकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर संघटनांच्या कृती समितीने आयुक्तांना नोटीस देत मागण्या पूर्ण करण्याबाबत स्मरण करून दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास 8 फेब्रुवारीला संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आयुक्तांनी सर्वच कामगार कर्मचारी संघटनांच्या कर्मचार्‍यांना बैठकीसाठी बोलविले होते. या बैठकीत सर्वच विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक दृष्टीने विचार करून मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. अनेक मागण्या या राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्याबाबतही त्यांनी पदाधिकार्यांना सांगितले. मात्र ठोस असा एकही निर्णय न झाल्याने पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी हजेरी पुस्तक बंद करून पूर्णपणे बायोमेट्रिक हजेरी कर्मचारी व अधिकार्यांसाठी बंधनकारक केली आहे. बायोमेट्रिकचा निर्णय घेतला त्याप्रमाणे कर्मचार्यांच्या मागण्याही सोडवा, अशी मागणी संघटनांनी केली. बैठकीस कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी गजानन शेलार, डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. तानाजी जायभावे, सुरेश मारू, राजेंद्र मोरे, संतोष वाघ आदी उपस्थित होते.