विल्होळी प्रवेशव्दारावर मिग २१ चे ‘लॅण्डिंग’

महापालिका आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विल्होळी प्रवेशद्वारावर ’एनरिचिंग नाशिक’ हे भव्य वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे.

Nashik
विल्होळी प्रवेशद्वारावर बसविण्यासाठी मिग विमानांच्या प्रतिकृतीची जुळवणी अंतिम टप्प्यात आहे.

महापालिका आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विल्होळी प्रवेशद्वारावर ’एनरिचिंग नाशिक’ हे भव्य वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून, एचएएलच्या सहकार्याने ’मिग २१’च्या सुधारित आवृत्तीच्या दोन विमानांच्या प्रतिकृती बसविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर या प्रतिकृतीचे उदघाटन करण्यात येईल.

एचएएलसोबत झालेल्या करारानुसार सर्वप्रथम सुखोई ३० या लढाऊ विमानाची प्रतिकृती बसविण्यात येणार होती. मात्र सुखोईचे जुने विमान उपलब्ध होत नसल्याने त्यात बदल करण्यात आला. सुखोईऐवजी मिग २९ विमान बसविण्याचा निर्णय झाला. परंतु, मिग २९ चीही प्रतिकृती मिळत नसल्याने आता अखेरीस मिग २१ ची प्रतिकृती उपलब्ध झाली आहे. एचएएलकडून ही प्रतिकृती मिळणार असून, त्याची पाहणी पालिकेच्या पथकाने केली आहे. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विल्होळीत भव्य प्रवेशद्वार उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत विल्होळीची जागा निश्चित केली. ‘एनरिचिंग नाशिक’ अशा नावाचे वाहतूक बेट तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी आता मिग २१ विमानाची प्रतिकृती बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.