कंटेनरमधून परप्रांतात जाणारे 49 कामगार आश्रयस्थळी

प्रातिनिधिक फोटो

करोनच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय कामगार सोमवारी (दि.30) रात्री कंटेनरमधून गावाकडे निघाले होते. सातपूर पोलिसांनी कंटेनर मंगळवारी पहाटे 4 वाजता पिंपळगाव बहुला सिलिंग पॉइंट येथे अडवत पाहणी केली असता आतमध्ये 49 कामगार दाटीवाटीने बसलेले दिसले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनरमधील परप्रांतीय कामगारांना सातपुरमधील मनपा शाळेत आश्रयस्थळी ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी कंटेनर जप्त केला असून चालकास अटक केली आहे. 

चालक पप्पू अब्दुल खान (27, सध्या रा.भिवंडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.  

    करोना आजार आटोक्यात आणण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स ठेवा, असे वारंवार पोलीस आवाहन करत आहेत. तरीही, महाराष्ट्रात रोजगारानिमित्त  आलेले परप्रांतीय कामगार आदेशाचे उल्लंघन करत आपआपल्या गावाकडे जाण्याचे प्रयत्न करत

आहेत. त्या सर्वांवर पोलीस कारवाई करत आहेत. मंगळवारी पहाटे सातपूर पोलीस पिंपळगाव बहुला सिलिंग पॉईंटवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी पोलिसांनी त्र्यंबकेश्वरकडून आलेला कंटेनर (एम एच 04, ई बी 9228) अडविला. चालकास विचारणा केली असता त्याने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाही, त्यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता आतमध्ये 49 कामगार दाटीवाटीने बसलेले दिसले. पोलिसांनी कंटेनर जप्त केला असून चालक पप्पू खान अटक केली.  

कामगारांची वैद्यकीय तपासणी

कंटेनरमधील 49 कामगारांना मनपा शाळा क्रमांक 26, स्वारबाबानगर, सायपूर येथे आश्रयस्थळी ठेवण्यात आले आहे. याठिकाणी सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.