घरमहाराष्ट्रनाशिकविखे, क्षीरसागर यांना मंत्रिपदे हा राजकीय भ्रष्टाचार

विखे, क्षीरसागर यांना मंत्रिपदे हा राजकीय भ्रष्टाचार

Subscribe

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप; भाजपकडून पक्षांतर कायद्याचे उल्लंघन

भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेस आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून पळवापळवी केली जाते. राधाकृष्ण विखे -पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदे देऊन मुख्यमंत्र्यांनी राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना विखे, क्षीरसागर यांना दिलेले मंत्रिपद घटनाबाह्य असून यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, असे सांगत या दोघांची मंत्रिपदे काढून घेण्याची मागणी चव्हाण यांनी केली. नाशिक येथे रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विखे, क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले. एखाद्याला मंत्रिपद देताना तो विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य असावा लागतो. तसेच मंत्रिपदाची शपथ घेतली तरी सहा महिन्यांच्या आत विधानसभा सदस्य किंवा विधानपरिषद सदस्य व्हावे लागते. तीन महिन्यांवर निवडणुका आहेत. फडणवीस सरकारचा कालावधी संपत असल्यामुळे या तिघांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होता येणार नाही. मुळात वाजपेयी यांनी केलेल्या घटना दुरुस्तीत पक्षांतराची व्याख्या स्पष्ट केली आहे. घटनेच्या कलम १६४ (१ ब ) नुसार पक्षांतर बंदी असताना कुठल्याही लोकप्रतिनिधीला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात मंत्री म्हणून जात येणार नाही. या घटनेच्या तरतूदीनुसार विखे, क्षीरसागर मंत्रिपदी राहूच शकत नाही. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रिपद देणे हा लाचेचा प्रकार असून हा राजकीय भ्रष्टाचार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. याप्रकरणी सोमवारी (दि.२४) उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यानंतर हे प्रकरण अधिक स्पष्ट होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करत यापुढील निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्यात याव्यात, अशी विरोधी पक्षांची मागणी असल्याचे ते म्हणाले. अमेरिका, इराण या दोन देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धोरण आखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील. डॉ. प्रतापराव वाघ आदी उपस्थित होते.

वंचित आघाडीने भूमिका स्पष्ट करावी

वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आठ जागांवर फटका बसला हे मान्य आहे; परंतु भाजपला मदत करणे हा आपला हेतू आहे की, आपले उमेदवार निवडून आणणे याबाबतची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट करावी, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीविषयी चर्चा सुरू असून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याविषयी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रखर राष्ट्रवाद, काश्मीरचा मुददा, बालाकोट हल्ला, राममंदिर हे मुद्दे पुढे आणले गेले. आम्हाला वाटले की, शेतकरी आत्महत्या, आर्थिक विकासदर, दुष्काळ, शेतकरी प्रश्न हे प्रश्न प्रभावी ठरतील. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस रणनीती ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सेना -भाजपातील वाद दिखावा

मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेत सध्या कलगीतुरा रंगला असला तरी या दोघांनाही एकमेकांशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे हा वाद केवळ दिखावा आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींना साथ देणारे मित्रपक्ष सध्या मोदींवर नाराज आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेशी कोणत्याही परिस्थितीत युती करा, असे आदेश भाजप वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे सेना भाजप केवळ एकमेकांविरुद्ध आरोप करून राजकीय फायदा करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -