खुशखबर: पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीसह पुस्तके

शिक्षण समितीच्या बैठकीतील निर्णय; वर्षा भालेरावांनी सादर केला प्रस्ताव

Nashik
varsha bhalerao
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती शुल्क, पुस्तके

महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची पुस्तके तसेच शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिक्षण समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. नगरसेविका वर्षा भालेराव यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता.

शिक्षण समितीची बैठक सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ११) महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत भालेराव यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा मुद्दा मांडला. सदर मागणी सोनवणे यांनी मान्य करीत प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेशित केले. यावेळी शालेय गणवेशाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना येत्या १५ ऑगस्टपर्यंत एक गणवेश मिळणार असून दुसरा गणवेश सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान दिला जाईल असे प्रशासनाने सांगितले. प्रत्येक शाळेत सीसी कॅमेरे लावावेत तसेच जेथे नादुरुस्त अवस्थेत कॅमेरे आहेत, ते दुरुस्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बैठकीस उपसभापती प्रतीभा पवार, संतोष गायकवाड, स्वाती भामरे, राहुल दिवे, दिनकर आढाव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळेल

महापालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते. परंतु आर्थिक परीस्थिती अभावी त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस मुकावे लागते. यापार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क महापालिकेने अदा केल्यास तसेच पुस्तके महापालिकेने दिल्यास या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळेल. – वर्षा भालेराव, शिक्षण मंडळ सदस्य

शाळांच्या वेळेचा निर्णय आयुक्तांचा कोर्टात-

महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वी प्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव्या अशी मागणी बैठकीत सदस्यांनी केली. यावेळी सांगण्यात आले की, महापालिकेच्या एकुण १२८ शाळा होत्या. त्यातील अनेक शाळा बंद करून तर काहींची समायोजन करून ९० शाळा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच सोेयीचा विचार करून एकाच सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षण अधिकार्‍यांनी आयुक्तांच्या संमतीने घेतला. परंतु तो अव्यवहार्य असल्याचे शिक्षकांचे आणि शिक्षण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. एकाचवेळी वर्ग भरत असल्याने अनेक शाळांमध्ये एकाच वेळी शंभर ते दीडशे मुलांना शिकवायला लागते. त्यामुळे मुलांना नीट शिकवले जात नाही अशी तक्रार आहे. त्यामुळे यापूर्वी देखील हा विषय चर्चिला गेला होता. शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सदरचा निर्णय आयुक्तांचा असल्याचे सांगितल्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीतील महत्वाचे निर्णय

– माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींसाठी सायकल खरेदी.
– महापालिकेच्या ७२ शाळा इमारतींना स्वच्छता गृह बांधणे.
– महापालिकेच्या सर्व शाळा इमारतीत सीसी कॅमेरे बसवणे.
– पंचवटीतील शाळा क्रमांक १० ची दुरुस्ती करणे.
– सर्व शाळांना वॉटर प्युरिफाय बसवणे.
– चुंचाळेतील शाळा ७५ साठी नवीन इमारत बांधणे.