घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात मनसे पदाधिकारी

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात मनसे पदाधिकारी

Subscribe

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची 'मनसे' दिलजमाई

नाशिक नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांना मदत करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत नेमके कोणाला पाठींबा द्यावा, हे स्पष्ट केले नसले तरी नाशिकमध्ये मनसे नेते राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सक्रिय झाल्याचे दिसून येते. छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता.२८) दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळात मनसे नेत्यांचीही प्रमुख उपस्थिती दिसून आली. मनसे नेते भुजबळांसोबत एकाच गाडीतून आल्याचेही बघावयास मिळाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा लोकसभा निवडणूक न लढवता भाजप विरोधी भूमिका घेण्याचे ठरवले आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात म्हणजेच पर्यायाने भाजपविरोधात भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीला मदत करा याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. पण मनसेच्या भाजपविरोधी भूमिकेचा आघाडीलाच फायदा होईल हे निश्चित. नाशिकमध्ये मनसेने राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनसे नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांच्यात दिलजमाई झाल्याचे गुरुवारी (ता.२८) दिसून आले. म्हणूनच की, काय मनसे पदाधिकार्‍यांनी आता राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे राहण्याची भूमिका घेतली आहे. मनसे नेते आता भुजबळांसमवेत प्रचारातही उतरले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळासह आले असता त्यांच्यासमवेत मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांचीही प्रमुख उपस्थिती दिसून आली.

- Advertisement -

अधिकारी निरूत्तर

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्याची मागणी केली. पाणी टंचाई असलेल्या गांवे व वाड्यांवर ग्रामपंचायतीने मागणी केल्यानंतर तातडीने टँकर मंजूर करून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची गरज आहे. मात्र, अनेक तालुक्यांमध्ये वाडे-पाडे व वस्त्यांवर टँकर दिले जात नाहीत. तसेच जिल्ह्यात मार्चपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असताना मागील भेटीत जिल्ह्यात पुरेसा चारा असल्याचे आपणास सांगण्यात आल्याचे सांगत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात चारा लागवड केल्याचे एका अधिकार्‍यांने सांगताच चारा पिकवण्यासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल भुजबळांनी करताच अधिकारी निरूत्तर झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -