लाखावर भाविक भगवती चरणी लीन

श्री सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्ताने धुळे, जळगाव, नंदुरबार, खान्देश भागातून तसेच मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक पायी मजल दरमजल करत शहरात दाखल होऊ लागले आहेत.

Nashik
Saptashrungi-Devi-Temple
श्री सप्तश्रुंगी चरणी लाखो भाविक लीन झाले.

श्री सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्ताने धुळे, जळगाव, नंदुरबार, खान्देश भागातून तसेच मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक पायी मजल दरमजल करत शहरात दाखल होऊ लागले आहेत. कळवण ते देवळा, लोहणेर, नांदुरी हे रस्ते गर्दीने अक्षरशः गजबजून गेले आहे. पदयात्रेकरूंच्या चहा, नाष्टा, जेवण, पाण्याच्या सोयीसाठी विविध सेवाभावी संस्था परिश्रम घेत आहे. बुधवारी (१७ एप्रिल) सुमारे एक लाखाच्यावर भविकांनी भगवतीचे दर्शन घेतले.

चैत्रोत्सवास मोठ्या प्रमाणात भाविक पायी दर्शनासाठी येतात. यात विशेषतः खान्देशवासियांची संख्या लक्षणीय असते. हे भाविक पायी यात्रा करून कळवण शहराच्या आसपास पोहचतात. यावेळी लोहोणेर, विठेवाडी, बेज फाटा, ते कळवण शहरात विविध सेवाभावी संस्था यात्रेकरुंसाठी अन्नदान करतात. सप्तशृंगी गड येथील उद्योगपती राजाभाऊ शिंदे परिवार मागील ४ वर्षापासून नियमित २४ तास भाविकांसाठी पाणपोईची सोय करतात. याचप्रमाणे राजाभाऊ शिंदे रोज सकाळी गरम पोहे वाटप करतात. राजे डीजे मित्रमंडळ दरवर्षी लिंबू सरबत वाटप करतात. यात्रेकरूच्या सेवेसाठी डॉ. वसंतराव मेडिकल कॉलेज औषधे उपलब्ध करून देतात. इतर मंडळेही चहा – बिस्किटे, पाणी, फळे वाटप करून आपली सेवा देतात हे विशेष. परंतु, गर्दीचा फायदा उचलत भुरट्या चोरट्यांनी भाविकांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला. रोपवे ट्रॉली येथील कार्यरत सुरक्षारक्षकाने यांनी १२ वर्षीय मुलीला गळ्यातले मंगळसूत्र चोरी करताना पकडले. या मुलीला पोलिसांचा ताब्यात देण्यात आले.