खासदार छत्रपती संभाजीराजेंनी वडेट्टीवारांना सुनावले

ओबीसीतून तर नकोच नको, आम्हाला आमचेच आरक्षण देण्याचा केला पुनरुच्चार

MP_Sambhaji
संभाजीराजे छत्रपती यांची खंत

आम्हाला कोणाचाच हक्क हिरावून घ्यायचा नाही. ओबीसीतून तर नकोच नको, आम्हाला आमचेच आरक्षण द्या. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींचे आहे. उगाच ते आमच्या नावाने खपवू नका, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांना खडे बोल सुनावले. माझ्या वाक्याचा गैर अर्थ काढू नका, असेही ते म्हणाले.

ओबीसीमधून आरक्षण आम्हाला नको. आम्ही एसईबीसीमधून आरक्षण मागितले आहे. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींचे आरक्षण आहे. एसईबीसीचे आमचे आहे. जे ईडब्ल्यूएस म्हणत आहेत, ते वेगळे आहे, केंद्राचे आहे. त्यातून जर धोका निर्माण होत असेल तर ते कोण घेणार? त्याबाबत जे भूमिका घेत आहेत, त्यांनी समाजाला लिहून द्यावे, अशा शब्दात म्हणत राजेंनी घणाघात केला.

…तर माझी पात्रता नसेल

दलित, ओबीसीविरोधी जर मी बोललो असेल तर माझी छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याची पात्रता नसेल. माझे पूर्ण भाषण ऐकले तर त्यांना समजेल. ओबीसी आणि दलितांचे हित बिघडेल, अशी माझी कधीच भूमिका नव्हती, असेही त्यांनी म्हटले.