घरमहाराष्ट्रनाशिकगर्दीच्या सभेतही खासदार चव्हाण एकटेच!

गर्दीच्या सभेतही खासदार चव्हाण एकटेच!

Subscribe

कार्यकाळातील अखेरच्या भाषणाच्या संधीपासून राहिले उपेक्षित; दोन किलोमीटर पायपीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित राहिले खरे. मात्र, लाखोंच्या या गर्दीत त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याने ते एकटे पडल्याचे प्रकर्षाने दिसून आले. कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी विद्यमान खासदार या नात्याने त्यांना अखेरच्या भाषणाची संधी मिळण्याची अपेक्षा होती. बोलण्याची संधी मिळणे दुरापास्त, पण सभास्थळापासून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. यावरून ‘सत्ता गेली की किंमत शून्य होते’ असेच म्हणावे लागेल.

पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी भाजप-सेना युतीच्या उमेदवारांसाठी थेट मोदींनी सभा घेतली. हजारोंचा जनसमुदाय मोदीऽऽऽ मोदीऽऽऽ अशी गर्जना करत भरउन्हात सभास्थळी दाखल झाले. गर्दीचा उच्चांक गाठणार्‍या या सभेला संबोधित करण्याची नामी संधी आमदारांनी शोधली आणि केंद्र सरकारच्या योजनांचा कसा लाभ झाला, याचा मनसोक्त उदोउदो केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे खुमासदार शैलीतील भाषण सुरू असतानाच मोदींचे आगमन झाले. व्यासपीठावर येताच त्यांनी युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यांच्या बाजूला उभे असलेले दुसरे खासदार हरिश्चंद्र चव्हाण लागलीच पुढे सरसावले. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मोदी पुढे निघून गेले. मुख्यमंत्र्यांनी उमेदवाराचा परिचय करून दिला आणि तसेच पुढे घेऊन जात छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोदी मंचावर विराजमान झाले. भाषण सुरू होण्यापूर्वी मोदींनी पालकमंत्र्यांशी हितगुज साधत स्थानिक मुद्यांना हात घातला. चंपाषष्टीला कांद्याचे भरीत खातात की वांग्याचे याविषयी माहिती नसलेले पदाधिकारी अवतीभोवती फिरत होते. पण, ज्यांच्या मतदारासंघात कांद्याचे आणि वांग्याचे उत्पादन होते, त्यांना साधी विचारणा सुद्धा करण्याची कोणी त्रास करून घेतला नाही, याचे अप्रुप वाटले नाही तर नवलच!

- Advertisement -

सभा संपल्यांनंतर सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे खासदार चव्हाण रस्त्याने चालत गाडीकडे आले. हजारो कार्यकर्त्यांचा समुदाय त्या रस्त्यावरून माघारी जात होता. या हजारोंच्या गर्दीत चव्हाण मात्र हरवल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -