शेतकर्‍यांना सुखाची झोपही झाली पारखी

वीजपुरवठा वेळापत्रक बदलामुळे जागरण

Nashik
mseb
महावितरण (प्रातिनिधिक फोटो)

ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात कंपनीकडून बदल झाला असून, यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या अडचणीची सामाना करावा लागत आहे. आठवड्यातील चार दिवस रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेस थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांतून महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे.

रात्री होणार्‍या थ्री फेज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले असून, रात्री गवतातून जाऊन कृषीपंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.


हे देखील वाचा : माझी लेक माझं झाड माझी शाळा


साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्री शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योगधंद्यांच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात-आठ तास वीजपुरवठा उपलब्ध होतो. याचवेळी शेतकर्‍यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्याच्यातच भरात भर म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकर्‍यांना भेटी देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

शेतकर्‍यांच्या सोयीनुसार वीजपुरवठ्यात बदल व्हावा

सरकार आणि वीज कंपनी शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळत आहे. वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा 3 ते 4 तास वीजपुरवठा होईल, असा बदल करावा.-तुषार खैरणार, प्रहार शेतकरी संघटना, तालुकाध्यक्ष

वीज कंपनीकडून झालेले बदल अजब

वीज वितरण कंपनीकडून केलेला बदल अजब आहे. दिवसभरात शेतात काबाडकष्ट करून शेतकर्‍यांना रात्रीच्या या बदलामुळे जागरण करावे लागते. यामुळे शेतकर्‍यांची सुखाची झोपही आता त्यांना पारखी झाली आहे.-कपिल सोनवणे, शेतकरी, औंदाणे.