घरमहाराष्ट्रनाशिकशहर सेवेतून ‘लालपरी’ला लक्ष्मीदर्शन

शहर सेवेतून ‘लालपरी’ला लक्ष्मीदर्शन

Subscribe

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत शहर बससेवेतून राज्य परिवहन महामंडळाच्या खजिन्यात ४२ कोटी १२ लाख ४३ हजार ८ रुपयांची भर पडली आहे.

सुशांत किरवे

सणासुदीच्या दिवशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जादा वापर झाला तरीही एसटीच्या महसुलात घसघशीत भर पडण्याचा प्रसंग तसा विरळाच. मात्र, असा महसूलवाढीचा अनुभव राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला २०१८ या आर्थिक वर्षात आला. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत शहर बससेवेतून राज्य परिवहन महामंडळाच्या खजिन्यात ४२ कोटी १२ लाख ४३ हजार ८ रुपयांची भर पडली आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये १ कोटी ५६ लाख ७३ हजार ४५६ रूपयांची महसुली वाढ झाली आहे.

- Advertisement -

एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षेची हमी देणारी राज्य परिवहन महामंडळाची सेवा मानली जाते. शिवशाहीत पासधारक विद्यार्थ्यांना सवलत नाही. शिवशाहीत ज्येष्ठांना वातानुकूलित व्यवस्थेचा त्रास जाणवतो. त्यामुळे सर्व प्रवाशी व भाविकांची लालपरीलाच प्रथम पसंती असते. तसेच एसटीला प्रवासी भाड्यात सूट आहे. हात दाखवा, गाडी थांबवा या सुविधेमुळे ग्रामीण भागासह शहरी प्रवाशांचा आजही कल एसटीकडेच आहे. उन्हाळी सुटी, दिवाळी, रक्षाबंधन सण, श्रावणी सोमवार त्र्यंबकेश्वर यात्रेच्या दिवशी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची येजा होते. खासगी वाहनांप्रमाणेच एसटीवरील ताणही वाढतो. त्यासाठीच राज्य परिवहन महामंडळाने गतवर्षी जादा बसफेर्‍यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यास प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महसुलाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सणासुदीच्या दिवसांत एसटीच्या कमी अंतरावरील फेर्‍यांना अधिक मागणी असते. जून २०१८ पासून अंमलात आलेल्या भाडेवाढीनुसार एसटीचे किमान तिकीट सहावरून १० रुपये झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दीड कोटींची महसूलात वाढ

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ४० कोटी ५५ लाख ६९ हजार ५५२ रूपये महसूल शहर बससेवेतून राज्य परिवहन महामंडळाला मिळाला आहे. तर एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये ४२ कोटी १२ लाख ४३ हजार ८ रूपयांचा महसूल शहर बससेवेतून मिळाला आहे. त्यामुळे २०१८ मध्ये १ कोटी ५६ लाख ७३ हजार ४५६ रूपयांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

भाविक, प्रवाशांच्या प्रतिसादामुळे महसूलात वाढ

उन्हाळी सुटी, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दिवाळी, श्रावण महिन्यातील त्र्यंबकेश्वर यात्रा, निवृत्तनाथ यात्रा यासह वणी यात्रेच्या निमित्ताने भाविक व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने जादा बसफेर्‍या उपलब्ध करून दिल्याने हा महसुला वाढीचा फायदा झाला आहे. – अरूण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक

नाशिकरोडला सर्वाधिक महसूल

चालकांनी सुरक्षित वाहन चालवावे, यासाठी वेळोवेळी प्रबोधन केले जाते. भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी वेळेत एसटी बसेस मागणीनुसार उपलब्ध देण्यात आल्या. नाशिकरोडला रेल्वेस्टेशन, विविध कार्यालये, महाविद्यालये असल्याने या मार्गावरून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वर्षभरात झाल्याने नाशिकरोड मार्गाचा सर्वाधिक महसूल पंचवटीला आगाराला मिळाला आहे. – शुभांगी शिरसाठ, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, पंचवटी आगार

शहर बससेवेची सद्यस्थिती

प्रवाशांच्या सोयीसाठी पंचवटी आगारतर्फे शहरात दररोज १५० एसटी बसेस उपलब्ध करण्यात आला आहेत. सकाळ व दुपार सत्रात १२० आणि रात्री ३६ बसेस सोडल्या जातात. दररोज एसटी बसेसच्या २ हजार ३४४ फेर्‍या होतात. पंचवटी आगाराला प्रवासी सेवेतून दैनंदिन उत्पन्न १५ लाख रूपये उत्पन्न मिळते. पंचवटी आगारतर्फे निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार, व्दारका, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर, अंबड, श्रमिकनगर, शिवाजीनगर, सातपूर, ओझरपर्यंत एसटी बसेस उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -