घरमहाराष्ट्रनाशिक‘पर्यटन’ - ‘पीडब्लूडी’चा भाविकांच्या जीवाशी खेळ

‘पर्यटन’ – ‘पीडब्लूडी’चा भाविकांच्या जीवाशी खेळ

Subscribe

गडाला जाळी बसवण्याच्या खर्चावरून टोलवा-टोलवी

सप्तश्रृंगीगडावर देवीच्या मंदिरावर असलेल्या डोंगराच्या दरडी कोसळण्यापासून भाविक आणि देवीचे मंदिर सुरक्षित करण्यासाठी लावण्यात येणार्‍या जाळ्यांचे (डे्रन मेस) 64 हजार 715 चौरस मीटर काम बाकी आहे. हे काम तीर्थक्षेत्र विकास निधीतून पूर्ण करण्यासाठी पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा समन्वय नसल्याने चार वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे गडावर भाविकांच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.

डोंगराला डे्रन मेस बसवण्याचे दुसर्‍या टप्प्यातील 64 हजार चौरस मीटर कामासाठी बांधकाम विभागाला सुमारे 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची पूर्तता पर्यटन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याद्वारे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनानेच नेमून दिलेली आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागानेही या कामाची चार वर्षे चालढकल केलेली आहे. पर्यटन विभागानेही कामाचे एस्टीमेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आले नसल्याचे म्हणत निधी मिळवून देण्याबाबत अनास्था दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही शासकीय विभाग एकमेकांची जबाबदारी टाळत गडावर भाविकांच्या जीवाशी खेळत आहेत.

- Advertisement -

गडावर कोसळणार्‍या दरडीला प्रतिबंध म्हणून देवीच्या मंदिराच्या अगदी माथ्यावर असलेल्या सुळक्याला व मंदिराशेजारील उजव्या बाजूला अधिक धोेकादायक डोंगराच्या भागाला पहिल्या टप्प्यात 18 हजार चौरस मीटरवर लोखंडी जाळी बसवण्यात आली. त्याचबरोबर मंदिरावर पडणार्‍या डोंगरांचे दगड वरच्यावर झेलण्यासाठी स्टील ग्रीड लावण्यात आले. त्याचबरोबर 5 हजार ज्युल किलो क्षमतेचे रॉक फॉल बॅरिअर डोंगरात मंदिराच्या अगदी कळसावर दीडशे मीटर क्षेत्रावर लावण्यात आलेले आहे. काम 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या डोमवर आणि लगतच्या परिसरात कोसळणार्‍या दरडी आणि दगडांना अटकाव बसला आहे. पण या कामाच्या दोन वर्षानंतर 12 जून 2017 रोजी पावसामुळे मोठी दरड कोसळली होती. रॉक फॉल बॅरिअरमुळे ती दरड वरच्यावर अडकली गेली. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली होती. ही या कामाची यशस्विता होती.

प्रदक्षिणा मार्ग बंद

डोंगराला दुसर्‍या टप्प्यात लोखंडी जाळी लावण्याचे प्रस्तावित आहे. हे काम प्रदक्षिणा मार्गाच्या प्रारंभीच डोंगरमाथ्यावर सुमारे 64 हजार 715 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या धोकादायक भागाला लोखंडी जाळी बसवण्याचे काम आहे. हे काम तेव्हाच पूर्ण झालेले नसल्याने देवीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणामार्गाने परशुरामबाला मंदिराकडे जाणार्‍या भाविकांवर दगड कोसळून भाविक जागीच ठार होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि ट्रस्टने प्रदक्षिणा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय ठेवा घेतलेला आहे. पण रखडलेले जाळी बसवण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. तेव्हापासून ते आजतागायत प्रदक्षिणामार्ग बंदच आहे. डोंगरावरूनही दगड कोसळण्याचे सुरूच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -