नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा ‘टेक ऑफ’

अलायन्स एअर देणार सेवा, १५ जूनचा मुहूर्त

Nashik
airoplain
प्रातिनिधीक फोटो

जेट कंपनी आर्थिक गर्ततेत सापडल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेज कंपनीचे टाईम स्लॉट अलायन्स एअर कंपनीला देण्यात आल्याने आता एअर अलायन्समार्फत येताय १५ जूनपासून पुन्हा या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ही सेवा दिली जाणार आहे.

एक वर्षापूर्वी म्हणजेच १५ जून २०१८ रोजी जेट एअरवेजने नाशिक-दिल्ली सेवेचा शुभारंभ केला होता. या सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रवासी आणि कार्गो या दोन्हीची वाहतूक या सेवेद्वारे होत होती. मात्र, जेट एअरवेज कंपनी आर्थिक गर्तेत अडकली. त्यामुळे एप्रिल महिन्यात जेट एअरवेजची सर्व उड्डाणे बंद करण्यात आली. याचा फटका नाशिक-दिल्ली सेवेलाही बसला. दरम्यानच्या काळात जेट एअरवेजचे महत्त्वाच्या शहरांना जोडणारे स्लॉट अन्य कंपन्यांना देऊ नये, अशी भूमिका स्विकारली. परंतु जेटच्या खरेदीसाठी अद्याप कोणत्याही कंपनीने स्वारस्य न दाखवल्याने आता हे स्लॉटही अन्य कंपनीकडे देण्यात आले आहेत. या नाशिक-दिल्ली सेवेचाही समावेश आहे. हे स्लॉट घेण्यासाठी अर इंडिया, अलायन्स एअर, विस्तारा, एअर एशिया, गो एअर, इंडिगो, स्पाईसजेट या कंपन्यांना पत्रही पाठविण्यात आले. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. त्यामुळे दिल्ली सेवेला मिळणार्‍या प्रतिसादाची दखल अलायन्स एअरने घेतली. त्यानुसार कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवून जेट एअरवेजच्या स्लॉटची मागणी केली. अखेर ही विनंती मान्य झाली असून येत्या १५ जूनपासून नाशिक-दिल्ली ही सेवा सुरू करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे.

अशी असेल वेळ

सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस सेवा असेल. नवी दिल्लीहून दुपारी १२.०५ला विमान निघेल आणि ते नाशिकला दुपारी २.१०ला पोहचेल. त्यानंतर नाशिकहून दुपारी २.४५ वाजता विमान निघेल आणि ते सायंकाळी ४.३५ वाजता पोहोचेल.

दैनंदिन सेवा सुरू करणार

सध्या ही सेवा आठवड्यातून तीनच दिवस देण्यात येणार आहे. ऑगस्टपासून प्रवाशांचा प्रतिसाद पाहता संपूर्ण आठवडाभर ही सेवा देण्याची तयारी अलायन्स एअरने दर्शवली आहे. तसेच प्रवासी सेवेसोबतच कार्गो सेवाही देण्यात येणार असल्याने नाशिकहून पुन्हा एकदा हवाईसेवेमार्गे निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here